

डोंबिवली : यापूर्वी अनेकदा रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे बळी गेले आहेत. आतातर काळाने विद्यार्थ्यावर घाव घातल्यानंतर शासन-प्रशासनाला खडबडून जाग आल्याचे दिसून येते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भावनाशून्य कारभाराचा नमुना डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात माणसाचा बळी गेल्यानंतर दिसून आला आहे. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी रोडला असलेल्या कावेरी चौकात बुधवारी (दि.23) संध्याकाळी टेम्पोखाली चिरडून एक विद्यार्थी जागीच ठार होऊन दुसरा जबर जायबंदी झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. एकीकडे रस्त्यावर स्पिडब्रेकर टाकण्यात आले. दुसरीकडे या चौकातील फेरीवाल्यांवर तात्पुरती थातूरमातूर कारवाई करण्यात आली.
डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील सर्व्हीस रोडवर एमआयडीसीकडून शेवटी जनतेच्या रोष पाहून आणि आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र या गतीरोधकांवर पांढरा पट्टा मारायचा आता बाकी ठेवला आहे. सद्या त्यावर सुका चुना पसरविला आहे. बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी कावेरी चौकात दोन शाळकरी मुलांना एका नशेखोर टेम्पो चालकाने उडविले. या अपघातात बुध्दशल खंडारे (16) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला वैभव शेंडगे (16) जबर जखमी झाला असून त्याच्यावर याच परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
या घटनेनंतर प्रशासनाला स्थानिक रहिवाशांनी धारेवर धरले आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात रस्त्यावर सुसाट वेगात धावणाऱ्या वाहनांखाली चिरडून भटक्या कुत्र्यांचे बळी गेले आहेत. आता माणसांच्या बळीची वाट बघत आहेत का ? अशी प्रशासनाला ताकीद येथील रहिवाशांनी त्यावेळी दिली होती. काही दिवस उलटून जात नाही तोच कावेरी चौकात भीषण अपघात घडून विद्यार्थ्याचा बळी पडला. निवासी विभागातील रस्ते आणि फूटपाथ बळकावून बसलेल्या फेरीवाल्यांबद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांसह हप्तेखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल परिसरातील रहिवाशांनी चीड व्यक्त केल्यानंतर गुरूवारी आणि शुक्रवारी दिवसभरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने फेरीवाल्यांना बसू दिले नाही. मात्र कावेरी चौक सोडून इतरत्र काही ठिकाणी फेरीवाले बसत असल्याचे दिसत आहे. निवासी परिसरात थातूरमातूर कारवाई न करता कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता यापुढे सर्व परिस्थिती शांत झाल्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान या भागात दिसून येईल असे एकंदर परिस्थितीवरून दिसत आहे.
फेरीवाल्यांवर कडक कार्यवाही व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेते-पुढाऱ्यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांना निवेदन दिले. यावेळी प्रशासनाच्या बेपर्वा कारभाराचा उपस्थित नेते-पुढाऱ्यांनी निषेध नोंदविला. बेकायदा फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणारे आणि सतत प्रशासनाकडे तक्रारी करून पाठपुरावा करणारे सत्यवान म्हात्रे यांनी कावेरी चौकात निषेधाचा मोठा फलक लावून प्रशासनाला इशारा दिला आहे. वाहतूक कोंडी, अवैध फेरीवाले, नादुरूस्त रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वाकड्या-तिकड्या वाहनांची पार्किंग, आदी प्रश्नांसंदर्भात प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे निवासी विभागातील समस्त रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत.