ठाणे : सर्व्हिस रोडवर भरधाव वाहनांचे नियंत्रण सुटले; कुत्र्यांपाठोपाठ माणसांचे बळी घेणार का ?

डोंबिवलीच्या निवासी विभागातील रहिवाशांचा सवाल
डोंबिवली
सर्व्हिस रोडवर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने श्वानाचा मृत्यूpudhari news network
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील सर्व्हिस रोडचे हल्लीच काँक्रीटीकरण झाले आहे. कल्याण-शिळ महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने वाहनधारक शॉर्टकट् म्हणून याच सर्व्हिस रोडचा वापर करत आहेत. मात्र एकही स्पीड ब्रेकर नसल्याने सर्व्हिस रोडवरून नियंत्रण सुटल्यासारख्या वाहनांखाली चिरडून भटक्या जनावरांचे बळी जात आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या पाठोपाठ आता माणसांचेही बळी घेणार का ? असा संतप्त सवाल निवासी विभागातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

अरूंद असलेल्या सर्व्हिस रोडवरून बसगाड्या, ट्रक, या सारखी मोठी वाहने सुसाट वेगाने धावत असतात. त्यामुळे अपघातांचे भय वाढले आहे. गेल्या काही दिवसांत या रस्त्यावर 3 भटकी कुत्री, दोन मांजरे, एक मुंगूस वाहनांखाली चिरडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आता माणसे मरणाची वाट पहात आहे का ? असा सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे. या रस्त्यावर गतीरोधक (Speed breaker) बसवावेत, अशी रहिवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. हा रस्ता एमआयडीसीच्या ताब्यात आहे. एमआयडीसीने या रस्त्याचे काँक्रीटीकरण केल्याने त्यांना त्यावेळीच या रस्त्यावर गतीरोधक बसविण्यास सांगितले होते. मिलापनगर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनने या संदर्भात प्रशासनाचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. शिवाय रहिवाशांनी या रस्त्यावर जागोजागी स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना भेटून आणि फोनद्वारे विनंत्याही केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याने भरधाव वाहनांखाली चिरडून मृत्युमुखी पडणाऱ्या प्राण्यांबद्दल रहिवाशांत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

निषेध नोंदविण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा

या भागात राहणारे पशुवैद्यक आणि प्राणी मित्र डॉ. मनोहर अंकोले यांनी वाहनांखाली चिरडून ठार होणाऱ्या प्राण्यांच्या घटनांबाबत हळहळ व्यक्त केली. डॉ. अंकोले यांनी अपघातात जबर जखमी झालेल्या एका कुत्र्याला उपचार करून वाचविण्याच्या प्रयत्न केला होता. या परिसरात राहणारे रहिवासी आता सुन्न प्रशासनाला जाग येण्यासाठी एक आठवड्याचा अवधी देणार आहेत. एमआयडीसी अणि केडीएमसीच्या विरूद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा पावित्रा रहिवाशांनी घेतला आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी, अशीही अपेक्षा डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news