

वसई : शहरातील भटके किंवा पाळीव अबोल प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी दफनभूमी नसल्याने त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मृत प्राण्यांची विल्हेवाट करण्याच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच गोखीवरे येथील क्षेपणभूमीजवळील परिसरातच दफनभूमी तयार करून विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
शहरात भटके व पाळीव प्राण्यांबरोबरच अनेक बेवारस प्राणी विविध आजारांमुळे किंवा अपघातामुळे मृत्युमुखी पडत असतात. त्यांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असतात. शहरात सद्यस्थितीत विविध भागात मृत होऊन पडणाऱ्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
भटके किंवा पाळीव प्राण्यांची विल्हेवाट कशी लावायची याचा प्रश्न प्रत्येक प्राणीप्रेमींना पडतो. पाळीव प्राण्यांच्या पालकांनी एखाद्या कुटुंब सदस्यासारखे जीव लावलेल्या प्राण्याचा मृत्यू झाल्यावर या मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात दफनभूमीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. भटके मृत प्राणी झालेले प्राणी ही उकिरड्यावरकिंवा नाल्याशेजारी टाकून दिले जातात. त्यामुळे त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. परंतु महापालिकेच्या कार्यक्षेत्रात दफनभूमी नसल्याने विल्हेवाट लावण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने दफनभूमी उभारावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरण्यात आली.
येथील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी ही याबाबत केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडे पत्रव्यवहार करून वसई विरार शहरातील मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीची समस्या मांडली होती. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या होत्या. या सुचनेनंतर महापालिकेने गोखीवरे येथील क्षेपणभूमी जवळील भागात दफनभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी मृत प्राण्यांची विल्हेवाट लावता यावी असा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी स्तरावर पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावास जिल्हाधिकारी स्तरांवरून परवानगी मिळाली असल्याने जनावरांच्या विल्हेवाट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच त्या ठिकाणी दफनभूमी उभारून मृत जनावरांची विल्हेवाट करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी दफनभूमी तयार करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू होते. तसा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांना दिला होता. आता त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.
अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका
पशुसंवर्धन विभागाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसारच विल्हेवाट करण्याची प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. मध्यंतरी पालिका गोखीवरे येथील कचराभूमीत मृत प्राण्यांची विल्हेवाट लावली जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे नियमानुसार स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे. शहरात कधी रस्त्याच्या कडेला, उघड्यावर मृत अवस्थेत प्राणी पडून असतील त्यांची विल्हेवाट योग्य रित्या लावावी असेही त्यांनी सांगितले आहे.