

कल्याण : सतीश तांबे
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात आता मनसे-शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी एकत्रित येऊन निवडणूक लढण्याच्या जागा वाटपाच्या वाटाघाटीची बोलणी अंतीम टप्प्यात आली आहे. केडीएमसीच्या 31 पॅनल पैकी 122 जागांमधील 52 जागांवर दावा करीत मनसेने निवडणूक लढण्याची तयारी केली आहे तर उर्वरित 70 जागा महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या वाट्याला येणार असल्याने 40 ते 45 जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोघांना मिळून 20 ते 25 जागा सोडण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र काँग्रेस पक्ष 20 जागांवर समाधान मानतील या बाबत शासंकता व्यक्त केली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे.
तत्कालीन शिवसेना पक्षाच्या पक्ष फुटीनंतर शिवसेना शिंदे गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रथमच कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी एकमेकांसमोर सर्व ताकदीनिशी उभे ठाकणार आहेत. शिवसेना शिंदे गट पक्षात पालिकेतील बहुतांश सर्वच शिवसेनेचे माजी नगरसेवक सामील झाल्याने हातावर मोजण्या एवढेच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत माजी नगरसेवक तग धरून राहिले आहेत. यंदाच्या महापालिकांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि उद्धव सेना एकत्रित निवडणूका लढण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहे.
मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने एकत्रित लढण्यासाठी जागा वाटपाची वाटाघाटी सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या सार्वत्रिक पालिका निवडणुकीसाठी मनसे व महाविकास आघाडी मित्र पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या स्थानिक नेत्याची पालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्रीत लढण्यासाठी जागा वाटपा संदर्भात गेल्या आठवड्यापासून चारही पक्षाच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या 2015 साली पार पडलेल्या सार्वत्रिक पालिका निवडणुकीत तत्कालीन शिवसेना पक्षाने निवडणुक लढवित सर्वाधिक जागा मिळविल्या होत्या. मात्र 2022 मध्ये शिवसेना पक्षात फूट पडून शिवसेना शिंदे गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट असे शिवसेना दोन गटाचे विभाजन झाल्याने शिवसेना शिंदे पक्षात केडीएमसीतील बहुतांश माजी नगरसेवक व पदाधिकारी सामील झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची ताकद कमी झाली आहे.
पालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षा निष्ठावंत शिवसैनिक व तरुण शिवसैनिकांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्यामुळे नवख्या व तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. मनसे ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने युती करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेना उबाठा सह मनसे ही सर्व ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारीला लागले आहे.
तब्बल पाच वर्षांनी महापालिकेची निवडणूक होणार असल्याने बदलाचे वारे पाहून निवडणूक जाहिर होण्या आधीच मनसेचे माजी नगरसेवकांनी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मनसेतील माजी नऊ नगरसेवकांपैकी केवळ तीन माजी नगरसेवक उरले. मनसेने महापालिका निवडणूकीसाठी नव्या जोमाने तरुणांच्या बळावर मनसेचे प्राबल्य असलेल्या 13 पॅनलमधील 52 जागा लढविण्याचे ठरविले आहे.
महाविकास आघाडीची जागा वाटपात मनसेने 52 जागांवर दावा सांगितल्याने उर्वरित 70 जागा या उद्धव सेनेच्या वाट्याला येणार असल्या तरी उद्धव सेनेने 70 मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला किती जागा द्यायच्या हे ठरवायचे आहे. त्यामुळे 70 पैकी 40 ते 45 जागा उद्धव सेनेच्या वाटयाला आल्या तर उर्वरित 20 ते 25 जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या वाट्याला सोडण्याची तयारी दर्शविली आहे.
काँग्रेसला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 10 जागा मिळू शकतात. मनसेने आपला 52 जागावर प्रखर दावा केला असला तरी महाआघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आपल्या कोटयातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासाठी सोडल्या जाणाऱ्या जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समाधान मानतील का? हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
उमेदवारांची अधिकृत यादी लवकर घोषित होणार
सद्यस्थितीला केडीएमसीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची सगळी मदार ही मनसे आणि उद्धव सेनेवर आहे. या दोघांची मराठी मतांवर मदार आहे. या दोन्ही पक्षांना मिळणारी मराठी मते विभाजीत होण्याचा धोका टळला आहे. उद्धव सेना आणि मनसे हे एकत्रित निवडणूक लढण्याची घोषणा झाल्याने आत्ता उमेदवारांची अधिकृत यादी लवकर घोषित केली जाऊ शकते. उमेदवारांच्या यादी जाहिर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट व मनसेतील माजी नगरसेवकांनी भाजप आणि शिंदे सेनेत उड्या मारल्याने त्यांच्या प्रभागातील नव्या उमेदीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.