

नालासोपारा (ठाणे) : वसई, अंबावाडी रोड ‘पैसे डबल करून देईन’ अशी आमिषे दाखवून टेलिग्राम अॅपवर सुरू असलेल्या फसवणूक साखळीत वसई पश्चिमेकडील एका युवकाची तब्बल 23 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिषेक शिरसाट यांनी फेब्रुवारी 8, 2025 पासून आरोपी महिला सुनाली हिने ‘टेलिग्राम अॅप’वर बिडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. तीने, तुमची गुंतवलेली रक्कम डबल करून परत केली जाईल, अशा स्वरूपाचे आश्वासन देत फिर्यादीकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण 23,25,014 रक्कम उकळली.
सुरुवातीला छोट्या छोट्या व्यवहारांत पैसे परत केल्याचा आभास देण्यात आला. मात्र नंतर रक्कम वाढत गेल्यावर परतावा थांबवला गेला आणि संपर्कही खंडित झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिषेक यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. टेलिग्राम अॅपवरील संबंधित खात्यांचा मागोवा घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.
नालासोपारा : वसई पूर्वेकडील नवजीवन, एस.पी. हाऊस येथे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम परत देण्याचे आश्वासन देत महिलांकडून लाखो रुपये उकळणार्या एका टोळीने तब्बल 63,86,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वसई पूर्वेतील नवजीवन परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी संशयित आरोपी रेणुका अडसुळे व सुरज केदारे यांनी आपसात संगनमत करून फिर्यादीसह इतर महिलांकडून सोने-चांदीचे दागिने व मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम विश्वासाने घेतली. मात्र ठरल्याप्रमाणे ती परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या गुन्ह्यात फिर्यादी आणि इतर महिलांनी एकत्रितपणे 63 लाख 86 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले असून, आरोपींनी हा सर्व व्यवहार विश्वास संपादन करून, फसवणूक करण्याचा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पेल्हार पोलिसांनी भादंवि कलम 420, 406 व 34 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संताप व खळबळ या घटनेनंतर परिसरातील महिलांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. अनेकांनी अशाच पद्धतीने गुंतवणूक केल्याचे समोर येत असून, फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.