

ठाणे : मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची पाच वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील दोन आरोपीं जेरबंद असून सुपारी घेणारा आरोपी ओसामा शेख फरार आहे.
ओसामा शेख याचा जमील शेखच्या हत्येची सुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला आणि मोसीम बटला यांनी दिल्याची कबुली देणारा एक व्हिडीओ बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ न्यायालयातून अधिकृतपणे मिळविण्यात आल्याचा दावा मृत शेख यांची पत्नी, मुलीने पत्रकार परिषद घेऊन केला आहे. आता तरी मुल्ला यांना अटक करा, सरकारला आणखी किती पुरावे हवेत असे प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी शेख यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्या करताना दुचाकी चालविणारा शाहिद शेख याला दोन दिवसांनी अटक झाली. मात्र शार्पशुटर इरफान सोनू शेख याला 3 एप्रिल 2021 रोजी उत्तर प्रदेशाच्या एसटीएफ पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पथकांनी उत्तर प्रदेशातून अटक केली होती. त्यावेळी इरफान सोनू शेख याला ओसामा याने दोन लाखांची सुपारी दिली होती आणि ती सुपारी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
त्यानंतर आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र मुख्य आरोपी ओसामा हा पोलिसांना सापडलेला नाही. मात्र आज फरार ओसामाचा जमील शेखच्या सुपारीची कबुली आणि पोलिसांकडून स्वतःचे इनकॉउंटर होण्याची भीती व्यक्त करणारा व्हिडीओ जमील शेखच्या कुटुंबीयांकडे आला आहे. त्या व्हिडिओमध्ये ओसामा म्हणतो, जमील शेखची हत्या केलीस तर तुला बँकॉकला सेटल करू, असे आश्वासन नजीब मुल्ला आणि मोसीम बटला यांनी दिले होते. मात्र त्यांनी कुठलेच वचन पाळले नाही. उलट माझा इनकॉउंटर करण्याचा प्रयन्त सुरु केले आहेत, तसे घडल्यास त्याला सर्वस्वी मुल्ला आणि बटला जबाबदार असतील, असे ओसामा व्हिडिओद्वारे दिलेल्या कबुलीनाम्यात म्हणत आहे.
या गुन्हयाचा तपास करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे अन्य आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून मुल्ला यांना अटक करणार होते म्हणून त्यांची तातडीने इतरत्र बदली करण्यात आल्याचा गंभीर आरोपीही शेख कुटुंबियांनी केला आहे. येऊर आणि यूपीमध्ये मुल्ला आणि आरोपींची दोनदा गुप्त बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याची सगळी माहिती असतानाही तपास अधिकारी दिलीप पाटील हे मुख्य आरोपींना वाचवित असल्याचा आरोप जमील शेखच्या पत्नींनी केला आहे. आता तरी सरकार हे माझ्या नवर्याला न्याय देणार की आम्ही सर्वांनी जाळून घेतल्यानंतर कारवाई होईल, असा इशारा शेख कुटुंबियांनी दिला आहे.