

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात विविध खेळासाठी प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या मैदानात मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून सिझन क्रिकेटचे सराव शिबीरे आयोजित केले जातात. मात्र त्यासाठी मैदानात एकमेव सिझन क्रिकेटचे पिच असल्याने शिबीर वेळेत पूर्ण करण्यात अडचण निर्माण होते. यासाठी पर्यायी सिझन क्रिकेटचे पिच तयार करणे अत्यावश्यक बनल्याने ती लवकर तयार करण्याची मागणी माजी नगरसेवक अजित पाटील यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह शहर अभियंता दीपक खांबित यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
भाईंदर पालिकेचे एकमेव भव्य असे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान आहे. या मैदानात शहरातील बहुसंख्य शाळा, कॉलेजच्या किडास्पर्धा आयोजित केल्या जातात. हे मैदान एमएमआर रिजनमधील सर्वात मोठे मैदान ठरले असून या मैदानात विविध खेळांसह क्रिकेटचे दोन सामने एकाचवेळी खेळले जाऊ शकतात. त्यानुसार पालिकेने या मैदानात शहरातील क्रिकेटपटूंच्या सिझन क्रिकेट सरावासाठी सिझनच्या नेट पिच तयार केल्याने शहरातील बहुतांश क्रिकेटपटू सिझन क्रिकेट नेट सरावासाठी या मैदानात येतात. सिझन सरावासाठी नेट पिच असले तरी सिझन क्रिकेटचे सामन्यांसाठी मैदानात एकच पिच उपलब्ध आहे.
यामुळे एकाच पिचवर सिझन टूर्नामेंट अवलंबून असतात. एकाच पिचमुळे सामन्याचे नियोजन योग्य होत नसून विलंब लागतो. अशातच क्रिकेटपटुंची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामान्यांत निवड करून त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासह मोफत प्रशिक्षणासाठी एमसीएकडून सराव शिबिराचे आयोजन केले जाते.
क्रिकेट पिच अत्यावश्यक
ही शिबीरे दिवाळीनंतर आयोजित केली जातात. मात्र मोठ्या मैदानात केवळ एकच सिझन पिच असल्याने शिबिराचे नियोजन करताना अडचण निर्माण होते. यामुळे शहरातील क्रिकेटपटुंना आपल्यातील क्रिकेटचे डावपेच वा खेळाचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध होत नाही. परिणामी या मैदानातील एकमेव सिझन क्रिकेट पिचला पर्यायी सिझन क्रिकेट पिच निर्माण करणे अत्यावश्यक बनल्याने या पिचचे काम लवकर सुरू केल्यास ती शिबिरावेळी सुस्थितीत उपलब्ध होईल. त्यामुळे सिझन क्रिकेट पिच लवकरात लवकर तयार करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी आयुक्तांसह शहर अभियंता दीपक खांबित यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.