

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना 25 लाखांची लाच घेताना बुधवारी रात्री उशिरा मुंबई लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. तब्बल पाच तास त्यांच्याच कार्यालयात पाटोळे यांची एसीबी मार्फत चौकशी केल्यानंतर नौपाड्यातील केवळ तीन अनधिकृत गाळे तोडण्यासाठी पाटोळे यांनी तक्रारदारांकडून तब्बल 50 लाखांची लाच मागितली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात उपायुक्त पाटोळे यांच्यासह आणखी दोघांना बुधवारी रात्री उशिरा एसीबीने अटक केली आहे.
तक्रारदार अभिराज डेव्हलपर्सचे अभिजित कदम यांनी दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये त्यांचे भक्तिमंदिर रोड या ठिकाणी कार्यालय आहे. त्यांनी जागामालक अनंत मढवी यांचे मालकीची सिटिएस नं. 39/ए/1/ए, हिस्सा नं. 15, विष्णू नगर, नौपाडा हि जागा विकसीत करण्यासाठी घेतली. सदर जागेत एकूण 3 दुकाने अनधिकृत असून त्याची तक्रार सदर जागा मालक अनंत मढवी हे अनेक वर्षे ठाणे महानगरपालिका येथे करत होते. परंतू पालिकेने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
सदर जागा मालक यांचे वय 87 वर्षे असल्याने या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी तक्रारदार अभिजित कदम यांना अधिकारपत्र दिलेले होते. त्यामुळे कदम यांचे सहकारी संदिप मावसकर यांनी त्यांची मंदार गावडे आणि सुशांत सुर्वे या पालिकेच्या अधिकार्यांशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या दोघांनी कदम यांची उपायुक्त शंकर पाटोळे यांचा सहकारी संतोष तोडकर यांची भेट करून दिली.
तोडकर यांनी शंकर पाटोळे यांच्या दालनात कदम यांना घेवून गेले. त्यानंतर पाटोळे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन देत एका कागदावर 20 लाख रकमेचा आकडा लिहून सदर रक्कम कारवाईकरीता द्यावी लागेल असे सांगून तोडकर यांचेशी बोलण्यास सांगितले. तोडकर यांनी कदम यांच्याकडे कारवाई करीता 10 लाख रुपये सुशांत सुर्वे नामक व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. कदम यांनी ही रक्कम सांगितलेल्या खात्यात जमाही केली.
ही रक्कम जमा झाल्यानंतर 31 जुलै ते 19 ऑगस्टच्या दरम्यान रोजी तिनही अनधिकृत गाळ्यांना दोन नोटीस दिल्या. पंरतू या गाळ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कदम यांनी पुन्हा 26 सप्टेंबर रोजी पाटोळे यांची त्यांच्या खासगीत भेट घेतली. सदर भेटी दरम्यान पाटोळे यांनी कदम यांना एका कागदावर रू. 50 लाख असे लिहन पुन्हा लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला 25 लाखांचा हप्ता 29 सप्टेंबर तर उर्वरीत 25 लाखांचा हप्ता कारवाई दरम्यान देण्यास सांगितले. यांनतर मात्र कदम यांनी 29 सप्टेंबर रोजी रोजी मुंबई लाचलुचपत विभागाकडे पाटोळे यांची तक्रार केली.
पाटोळेंची वसुली करणारा संतोष तोडकर कोण ?
पालिकेच्या माजी अधिकार्याच्या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष तोडकर नामक व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला असून हा संतोष तोडकरच शंकर पाटोळे यांच्या वसुलीचे काम करत असल्याचा आरोप या अधिकार्याने केला आहे. कळवा परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांच्या मागे देखील संतोष तोडकर या व्यक्तीच्या नावाची बरेच दिवस चर्चा सुरु होती. याशिवाय बुधवारी घडलेल्या लाच प्रकरणातही संतोष तोडकर याचा देखील सहभाग असल्याने संतोष तोडकर याला नेमका कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
पाटोळेंसह माजी नगरसेवकही अडचणीत येणार
तीन ते चार दिवसांपूर्वी पालिकेच्या एका माजी अधिकार्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यामध्ये या अधिकार्याने उपायुक्त पाटोळे यांच्यासह पालिकेच्या बड्या अधिकारी आणि स्थानिक माजी नगरसेवकांची नावे देखील घेतली आहेत. दिव्यातील सुभद्रा टाकले यांच्या भूखंडावर 2023 पासून अनधिकृत बांधकामे करण्यास सुरुवात झाली असल्याचे या अधिकार्याने या क्लिपमध्ये सांगितले आहे. 2022 पासून दिव्यात तब्बल 200 पेक्षा अधिक बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत.
यावर कारवाई करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना आहेत. सहाय्यक आयुक्तांनी कारवाई केली नाही तर परिमंडळ उपायुक्तांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यांनीही कारवाई केली नाही तर अतिक्रमण उपायुक्त यांच्यावर ही जबाबदारी आहे. विशेष पथक घेऊन ही बेकायदा बांधकामे तोडण्याचे विशेष अधिकारी पाटोळे यांना होते मात्र तरीही त्यांनी कारवाई केली नसल्याचे त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. दिव्यातील स्थानिक नगरसेवक यामध्ये सहभागी असून त्यांच्यामार्फतच पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप या ऑडिओ क्लिपमध्ये या माजी अधिकार्यांनी केला आहे.
असे अडकले उपायुक्त पाटोळे एसीबीच्या जाळ्यात
पाटोळे यांनी कदम यांच्याकडे पहिल्या हप्त्यापोटी 25 लाखांची मागणी केल्यानंतर कदम यांनी 10 लाखांच्या रकमेची व्यवस्था केली. तर उर्वरीत 15 लाख रकमेच्या 500 रुपयांच्या खेळण्यातील डमी नोटा एसीबीने उपलब्ध करून दिल्या. सुरुवातीला 30 सप्टेंबर रोजी कारवाईकरीता एसीबीचे पथक ठाणे येथील आर.सिटी मॉल या ठिकाणी आले. त्यानंतर कदम यांनी पाटोळे यांना फोन लावला. कदम यांनी वीस लाखाची व्यवस्था झाली आहे माझी, पाच लाख येतील पंधरा वीस मिनिटात, असे फोनवर सांगितले. मात्र पाटोळे यांनी माझा फोन येईल वाट बघा असे सांगितले. मात्र त्यादिवशी पाटोळे यांचा फोन आलाच नाही. त्यामुळे पुन्हा 1 ऑक्टोबर रोजी सकाळपासून सापळा रचण्यात आला. पहिल्यांदा कदम यांना पाचपाखाडी येथील मोदी ह्युन्दाई या शोरूम जवळ येण्यास सांगितले. मात्र दुपारी सुमारे 3 वा. पाटोळे यांनी लाचेच्या रकमेसह संतोषी माता मंदिर, मुलूंड येथे येण्यास सांगितले. यावरून पाटोळे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 10 लाख रोकड आणि 15 लाखांच्या डमी नोटा अशी 25 लाखांची रक्कम कापडी पिशवीस अन्थ्रासिन पावडर लावून सदर पिशवी पाटोळे यांनी बोलाविलेल्या संतोषी माता मंदिर, मुलुंड या ठिकाणी रवाना उपलब्ध करून देण्यात आली. मात्र पाटोळे यांनी पुन्हा फोन करून पालिका मुख्यालयात येण्यास सांगितले.
पालिका मुख्यालयाबाहेरच पाटोळे यांनी कदम यांना लाचेची रक्कम गाडीतच ठेवण्यास सांगून एकटेच कार्यालयात येवून भेटण्यास सांगितले. त्यानुसार कदम यांनी पाटोळे यांची त्यांचे कार्यालयात जावून भेट घेतली. थोडया वेळाने कदम यांची भेट झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या गाडीजवळ आले व त्यांच्या मागोमाग ओमकार राम गायकर नामक एक इसम दुचाकीवरून तक्रारदार यांच्या गाडीजवळ आला. सदर इसमाने तेथेच वाहन पार्क करून तक्रारदार यांच्या गाडीमध्ये जावून बसला व त्यांच्याकडून लाचेच्या रकमेची कापडी पिशवी हातात घेवून गाडीतून बाहेर आला असता जवळच असलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
प्रभाग समितीमध्ये डेटा इंट्री ऑपरेटर असलेल्या गायकर यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सदर रक्कम उपायुक्त शंकर रावजी पाटोळे यांच्या सांगण्यावरून स्विकारली असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच एसीबीचे पथक पाटोळे यांच्या ठाणे महागनरपालिका येथील तळमजल्यावरील कार्यालयात जावून त्यांची पाच तास चौकशी केल्यानंतर शंकर पाटोळे, ओमकार गायकर यांना अटक करण्यात आली.
शंकर पाटोळे यांच्या संदर्भात न्यायालयाचे काय आहेत ताशेरे
न्यायायल्याने पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे उपयुक्त शंकर पाटोळे यांच्या संदर्भात देखील महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या विरूध्द सन 2021 साली अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली होती. सदर खातेनिहाय चौकशीचे काय झाले? त्यानंतर त्यांना बढती कशी देण्यात आली. सदर चौकशींचे अंतिम निकाल काय लागला? प्रलंबित असल्यास चौकशींची सद्यस्थिती काय आहे? असे महत्वाचे प्रश्न न्यायालयाच्या वतीने शंकर पाटोळे यांच्या संदर्भात उपस्थित करण्यात आले आहेत.