

ठाणे : एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी राज्यभरात व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्री करणारे पंप सुरू करण्यात येणार आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त व्यावसायिक भागीदारीतून कार्यान्वित केला जाणार आहे.
उत्पन्नासाठी नवा मार्ग
याविषयी माहिती देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. केवळ प्रवासी तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. याच धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे."
एसटी महामंडळ गेल्या ७० वर्षांहून अधिक काळापासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम यांसारख्या कंपन्यांकडून आपल्या बसेससाठी डिझेल खरेदी करत आहे. महामंडळाच्या स्वतःच्या मालकीच्या २५१ ठिकाणी केवळ एसटी बसेससाठी इंधन वितरणाचे पंप आहेत. त्यामुळे पेट्रोल पंप चालवण्याचा आणि त्याच्या देखभालीचा उत्तम अनुभव महामंडळाकडे आधीपासूनच आहे.
प्रकल्पाची रूपरेषा
या अनुभवाचा फायदा घेत, आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यावसायिक करार: केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांशी व्यावसायिक करार केला जाईल.
जागा निश्चिती: राज्यभरात रस्त्यालगत असलेल्या आणि व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एसटीच्या जागांचे सर्वेक्षण करून २५ बाय ३० मीटरच्या जागा निश्चित केल्या जात आहेत.
'पेट्रो-मोटेल हब'ची उभारणी: या पंपांवर केवळ इंधन विक्रीच होणार नाही, तर 'रिटेल शॉप' देखील उभारले जाणार आहेत. यातून 'पेट्रो-मोटेल हब' तयार करण्याचा मानस असून, इतर व्यवसायांनाही पूरक संधी उपलब्ध होतील.
पारदर्शक महसूल: हा करार केंद्र आणि राज्य शासनाच्या उपक्रमांमध्ये होत असल्याने उत्पन्नाच्या वितरणात पूर्ण पारदर्शकता राहील.
भविष्यात व्यावसायिक इंधन विक्रीतून सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, तसेच महामंडळाला देखील उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होईल.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री