

Pratap Sarnaik |
ठाणे : हिंदी ही मुंबईची बोलीभाषा आहे. हिंदी आमची लाडकी बहीण आहे. मराठीपासून हिंदीपर्यंत पोहोचण्यास फार वेळ लागणार नाही, असे विधान राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याने भाषिक वाद उद्भवला आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात सरनाईक म्हणाले की, हिंदी ही आपल्या मुंबईची बोलीभाषा बनली आहे, मुंबईसारखी कुठेही शुद्ध हिंदी नसेल. हिंदी बोलताना मध्येच एखादा शब्द इंग्रजी किंवा मराठीत येतो. त्यामुळे हिंदी ही आपली बोलीभाषा झाली आहे, मीरा-भाईंदर माझा मतदारसंघ आहे. ठाण्यात जनतेशी मी बोलतो तेव्हा शुद्ध मराठीत बोलतो. मीरा भाईंदरमध्ये प्रवेश करताच माझ्या तोंडून हिंदी भाषाच निघते. मराठी ही आमची मातृभाषा, आमची आई आहे. पण हिंदी आमची लाडकी बहीण आहे. या लाडक्या बहिणींमुळे २३७ जागांवर आम्ही निवडून आलो आहेत, असेही सरनाईक म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैया जोशी यांनी आता, 'मुंबईत कोणतीही भाषा चालते. मराठी नाही तर गुजराथी भाषा पण चालेल. मराठी शिकलेच पाहिजे असे नाही' असे वक्तव्य केले होते. आता सरनाईकांनी हिंदीला लाडकी बहीण जाहीर केल्याने वादंग सुरू झाले आहे.