

दिवा : दिव्यातील साबेगाव परिसरात अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. पिण्यासाठी विकत आणलेल्या 20 लिटरच्या सीलबंद पाण्याच्या जारमध्ये चक्क साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साबेगाव परिसरातील एका कुटुंबाने घरगुती वापरासाठी 20 लिटरचा सीलबंद पाण्याचा जार विकत घेतला होता. जार पारदर्शक असल्यामुळे वापरण्यापूर्वी तो पाहताना त्यामध्ये साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुदैवाने हा प्रकार वेळेत लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दिवा परिसरात वर्षभर पाणीटंचाई असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर 20 लिटरच्या जारमधील ‘मिनरल वॉटर’ किंवा ‘आरओ वॉटर’वर अवलंबून असतात. मात्र या घटनेमुळे स्थानिक पाणी शुद्धीकरण केंद्रांच्या (आर ओ प्लांट) स्वच्छतेबाबत आणि त्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत
सीलबंद जारमध्ये साप कसा गेला, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अनेक ठिकाणी विनापरवानगी आणि नियमांचे पालन न करता सुरू असलेल्या पाणी प्रकल्पांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये जारच्या आत साप स्पष्टपणे दिसत आहे.
कठोर कारवाईची मागणी
या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच अन्न व औषध प्रशासनाने दिवा आणि आसपासच्या परिसरातील सर्व पाणी शुद्धीकरण केंद्रांची तातडीने तपासणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.