

ठाणे : हातात पिशवी घेऊन एक व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात आली. या पिशवीत काय आहे याचा अंदाज येण्यापूर्वीच पिशवीतून भला मोठा साप बाहेर आला आणि बघता बघता महिलांच्या वॉर्डमध्ये चक्क या सपाने फेरफटका मारायला सुरुवातही केली. बघता बघता रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, नर्स या सर्वांचीच या सपामुळे अक्षरशः त्रेधातीरपीठ उडाली. ज्या सापाने दंश केला त्याच सापाला घेऊन हा व्यक्ती थेट रुग्णालयात दाखल झाल्याने काही क्षणातच एखाद्या चित्रपटातील सिन असावा असा अनुभव रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आला.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात असलेल्या सिव्हील रुग्णालयात सोमवारी सर्पदंश झालेली व्यक्ती उपचारासाठी आली होती. उपचारासाठी येताना त्याने चक्क दंश केलेला तो सापही एका पिशवीतून सोबत आणला. मात्र, अचानक पिशवीतून साप सटकुन थेट महिला वार्डमध्ये शिरला. बघता बघता विषारी सापाने अनेक रुग्णांच्या खाटेखाली फेरफटका मारला. यावेळी घाबरलेल्या रुग्ण आणि डॉक्टरांनी आरडाओरडा देखील केला. अचानक साप पिशवीतून बाहेर आल्याने काय करावे हे अनेकांना कळलेच नाही. भलामोठा साप पाहुन महिला रुग्णांची तर भंबेरी उडाली.
धामण जातीच्या सापाचा हा पिशवीतून बाहेर आल्याचे कळताच ताबडतोब सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. सर्पमित्रांना तो साप मोठया शिताफीने पकडण्यात यश आले. सुदैवाने धामण जातीच्या या सापाने कुणालाही दंश केला नाही. सुदैवाने काही अघटीत घडण्यापूर्वीच त्या सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान ज्या रुग्णाने साप आणला त्या रुग्णाची चौकशी सुरू आहे. दरम्यान साप घेऊन आलेली व्यक्तीची प्रकृती ठीक असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.