

डोंबिवली : परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष पथकाने कल्याण-डोंबिवलीमध्ये चोरी-छुपे अवैधपणे चालणाऱ्या लेडीज सर्व्हिस बारच्या विरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताल बारवर पथकाने रविवारच्या मध्यरात्री अचानक धाड टाकली. या धाडी दरम्यान १५ बारबालांसह एकूण २८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दुसरीकडे पोलिसांची धाड पडताच बारबालांच्या आक्षेपार्ह नाच-गाण्यांवर मदहोश झालेल्या मद्यपींची झिंग खरखरा उतरली होती.
कल्याणच्या पश्चिमेकडील मुरबाड रोडला असलेल्या महाराजा बार अँड रेस्टॉरंटमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली ताल नावाने ओळखला जाणारा हा बार पहाटे उशिरापर्यंत चालतो. या बारवर वारंवार धाडी पडत असतात. तरीही निर्ढावलेले या बारचे चालक/मालकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे रविवारी रात्री केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नृत्यांगना तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप करत थिरकत असतात. दिलेल्या परवान्यामधील अटींचे उल्लंघन करून बारमध्ये वेटर म्हणून ठेवण्यात आलेल्या बारबालांचे नोकरनामे नसताना, तसेच परवानगी नसतानाही कानठळ्या बसविणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजात अश्लील व विभित्स हावभावाचे नृत्य करत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी या बारवर पाळत ठेवली होती.
अखेर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच तेथे बसलेल्या आंबटशौकिनांची बोबडी वळली. हा बार शासनाने दिलेल्या परवानगीच्या विहित वेळेपेक्षा जास्त वेळ चालू असल्याचे आढळून आले. या बारमध्ये १५ महिला गायिका तथा बारबाला तोडक्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप करत नृत्य करताना, तर या नृत्यांगणांवर मदहोश झालेले मद्यपीही नोटांची उधळण करताना आढळून आले.
89ubbbbbbbbbb88पोलिसांनी तात्काळ या साऱ्या दृश्यांचा पंचांसमक्ष ई-साक्ष ॲपमध्ये पंचनामा करून १५ महिला गायिका वजा नृत्यांगना, तसेच मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, पुरुष वेटर आणि ग्राहक १३ जणांसह एकूण २८ जणांच्या विरोधात सरकारतर्फे फिर्याद नोंदवून स्थानिक महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम २९६, २२३, ५४, ३ (५) सह महाराष्ट्रातील हॉटेल्स रेस्टॉरंट अँड बार रूममध्ये अश्लील नृत्य करण्यास प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण (त्यात काम करणाऱ्या) कायदा २०१६ चे कलम ३, ४, ८ (१) (२) (४), डान्सबार बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बारचे मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर अशा ६ आरोपींना अटक केली आहे.