

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कल्याणातील साहसवीर अजित कारभारी यांनी शिवरायांना सातासमुद्रापार मानवंदना दिली. तब्बल 16 हजार 732 फूट उंचीवर रशियातील कोलोम्ना या अतिथंड प्रदेशात एल - 410 विमानातून अजित कारभारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्काय डायव्हिंग करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला ध्वज फडकवला. (Shiv Jayanti 2025)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी जगभरात मोठ्या उत्साहात शिवप्रेमींनी साजरी केली. याच पार्श्वभूमीवर रशियन स्थित साहसवीर अजित कारभारी यांनी अवकाशात ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना दिली. कल्याण जवळच्या कोळीवली गावातील अजित कारभारी यांनी निवृत्त ब्रिगेडियर सौरभ सिंह यांच्या प्रोत्साहनाने रशिया देशातील एरोग्लॅड कोलम्ना येथे उणे 36 अंश सेल्सियस तापमान असताना देखील एल - 410 या हवाई जहाजातून समुद्र सपाटीपासून 5 हजार 100 मीटर (16 हजार 732 फूट) उंच आकाशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवत महाराजांना साहसी मानवंदना दिली.
कर्नल कोस्त्या क्रिवोशिव आणि राहूल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी ही साहसी कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला अशा प्रकारे मानवंदना देणारे कल्याणातील साहसवीर अजित कारभारी हे पहिले भारतीय ठरले आहेत.