

ठाणे : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे यांची हजेरी आणि बाकीच्या मंत्र्यांची गैरहजेरी यावरून महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र पुढे आले. महायुतीत पडलेली ही ठिणगी भाजप आणि शिंदे शिवसेनेत आलेल्या आयाराम-गयारामांच्या पक्ष प्रवेशाचे तत्कालिक कारण असल्याचे सांगितले जात आहे. या सार्या घमासानानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मंगळवारी उशिरा तह झाला. या तहामध्ये दोन्ही पक्षांनी दुसर्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचे नाही, असे सूत्र तयार करण्यात आले. दस्तुरखुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये ताणल्या गेलेल्या या प्रश्नाची सुरुवात झाली तरी कुठून, असा शोध घेतल्यानंतर हे सर्व पक्षप्रवेश सिंधुदुर्ग ते ठाणे या कोकणपट्टीतच झाल्याचे पुढे येत आहे.
दिवस विधानसभा निवडणूक झाल्यानंतरचे होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभेत कणकवलीमधून भाजपकडून नितेश राणे तर शिंदेंच्या शिवसेनेमधून कुडाळमधून नीलेश राणे विजयी झाले. मात्र, 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर राणे विजयी झाल्यानंतर काही दिवसांतच भाजपच्या तब्बल 50 ते 60 पदाधिकार्यांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. त्यावेळी राज्यस्तरावर याची ठिणगी पडली. मित्रपक्षांचेच कार्यकर्ते का फोडले जातात, असा प्रश्न विचारला गेला; पण काळाच्या ओघात या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. पण, मंत्री झालेले नितेश राणे भाजप वाढवण्यासाठी आणि आमदार झालेले नीलेश राणे शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहिले. यामधून शाब्दिक चकमकीही घडत राहिल्या. हाच विषय रत्नागिरीत उदय सामंत विरुद्ध नितेश राणे असाही पाहायला मिळाला. या सर्व वादावर खुद्द नारायण राणे यांनी पडदा टाकला, पण याचीच पुनरावृत्ती आता शिंदे शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात झाली आणि वादाला आणखी धुमारे फुटले. दीपेश म्हात्रे, महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे भाजपात आल्या, तर भाजपचे विकास म्हात्रे, कविता म्हात्रे शिवसेनेत गेले आणि या प्रवेशानंतर वादाला तोंड फुटले.
एकेकाळचे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची शिवसेना व्हाया भाजप असा प्रवास जो केला तो शिंदे शिवसेनेच्या जिव्हारी लागाला. या नाराजी नाट्यात भाजपने शिवसेनेचे पदाधिकारी घेणे आणि शिवसेनेने भाजपच्या पदाधिकार्यांना प्रवेश देणे या मागे महापालिकेचा ताबा मिळविण्याचे गणित दडलेले आहे. तिकडे नाशिकमध्ये मंत्री दादा भुसेंचे विरोधक अद्वैत हिरे भाजपात आले. या सगळ्या प्रवेशावर ‘काय ती झाडी काय ते डोंगर’ अशा डायलॉगने प्रसिद्ध असलेल्या शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर ज्या शब्दात टीका केली. ते शब्द जिव्हारी लागणारे ठरले. एखाद्या अबला महिलेवर अत्याचार करावा तसा भाजप वागत आहे, या टीकेने भाजप नेतेही अस्वस्थ झाले. पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर असा शाब्दिक सामना रंगला. हासुद्धा शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष होता. या सर्व संघर्षाची परिणिती मंगळवारी कॅबिनेटला शिवसेनेच्या मंत्र्यांनी मारलेली दांडी या संघर्षानंतर समेटाची बोलणी सुरू झाली आणि जो तह झाला त्यामध्ये कुठल्याही मित्रपक्षाच्या नेत्याला मित्रपक्षांनी प्रवेश देऊ नये, असे धोरण ठरले.
शिंदेंना ठाण्यात मोठा भाऊ म्हणून मान हवा आहे. दुसर्या बाजूला कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला झुकते माप हवे आहे. मात्र, भाजपने प्रदेशाध्यक्ष पदच कोकणकडे दिल्याने कोकणात भाजपने पक्ष म्हणून आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. पक्ष वाढवणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार असतो, त्या अनुषंगाने हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा मुद्दा शिवसेनेला आघात वाटू लागल्याने महायुतीमधील वादाची ठिणगी प्रखर होऊ लागली आहे.
हे प्रवेश ठरले वादाचे कारण... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला भाजपमधून शिवसेनेत आलेले विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या प्रवेशावेळचे चित्र. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश झाला. हे दोन्ही प्रवेश वादाचे कारण ठरले. दीपेश म्हात्रे यांचा 9 नोव्हेंबर रोजी सकाळी भाजपात प्रवेश झाला. विकास व कविता म्हात्रे यांचा प्रवेश रविवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.