

ठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या ठाण्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने बदलत असताना, अनेक वारशाच्या खुणा काळाच्या पडद्या आड जात आहेत. अशात प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांत ऐतिहासिक उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अनेक जुन्या इमारती हटविण्यात येत आहेत. याच प्रक्रियेत अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचे पाडकाम सुरू होते. पाडकामादरम्यान हा सुंदर कोरीव दगड प्रकाशात आला आणि कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.
या परिसराच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने, या दगडाचा नेमका उगम, काळ आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे. ठाणेकरांच्या मते, अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या विकासाच्या काळात सापडणे ही दुर्मीळ संधी असून, या ठेव्याचे तात्काळ जतन करणे अत्यावश्यक आहे.
अनेक ऐतिहासिक अवशेष मिळण्याची शक्यता
रुग्णालय परिसरात यापूर्वीही ब्रिटिशकालीन मुखवट्यांचे दगड बांधकाम पडताना दिसून आले. या जागेत अजूनही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. शहराचा विकास आणि इतिहासाचा वारसा या दोन गोष्टींची सांगड घालून जुन्या वस्तुंचे जतन करावे, अशी मागणी जोर धरते आहे.
भरपूर जुना वारसा, ठाण्याचा इतिहास उलगडणार
सुमारे अडीज ते तीन फूट उंच आणि सव्वा ते दीड फूट रुंद असलेल्या या दगडावर अत्यंत सूक्ष्मतेने केलेली शिल्पकला स्पष्ट दिसून येते. डोक्यावर पगडी घातलेले संत, त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा तिन्ही प्रतिमा अतिशय प्राचीन कलाशैलीत साकारल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा दगड भरपूर जुना असण्याची शक्यता आहे.