Thane Malanggad Road Potholes | मलंगगड रस्त्याची चाळण: भाल ते नांदीवली मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास जीवघेणा

प्रशासनासह लोकप्रतिनिधींविरोधात नागरिक, वाहनधारकांचा संताप
Bhal To Nandivali Road Dangerous Potholes
Bhal To Nandivali Road Dangerous PotholesPudhari
Published on
Updated on

Bhal To Nandivali Road Dangerous Potholes

नेवाळी : विकास आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यांचे दावे करणाऱ्या प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या घोषणांना कल्याण श्री मलंगगड रोडनेच जणू आरसा दाखविला आहे. भाल गावापासून ते नांदीवली दरम्यान या मुख्य मार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास अक्षरशः जीवघेणा बनला असून प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारवर्ग प्रवास करत असलेला मार्ग जीवघेणा यंदा देखील झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीव जाण्याआधी प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन रस्ता खड्डे मुक्त करणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

श्री मलंगगड भागाला कल्याण शहराशी जोडणारा हा मुख्य मार्ग दररोज हजारो नागरिक वापरतात. शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णवाहिकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र सध्या रस्त्यावर डांबरापेक्षा खड्डेच अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहनचालकांना खड्डे चुकविताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असून अनेक ठिकाणी वाहने अचानक खड्ड्यात आदळल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. मात्र लोकप्रतिनिधी या खड्ड्यांच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघाताचा धोका कल्याण श्री मलंगगड रस्त्यावर वाढला आहे.

Bhal To Nandivali Road Dangerous Potholes
Thane Crime : नशेच्या विदेशी गोळ्या, 2 किलो हायब्रीड गांजासह एक अटकेत

पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांकडून रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून तात्पुरती देखील केली जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे हा मार्ग खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात असून कल्याण पूर्व व कल्याण ग्रामीण या दोन विधानसभा मतदारसंघांना जोडत आहे. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. निवडणुकीच्या काळात विकासाच्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आता या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मौन का बाळगत आहेत, अशी टीका परिसरातून होत आहे.

Bhal To Nandivali Road Dangerous Potholes
Thane Ward Committee Election: ७ प्रभाग समितीवर शिवसेना, १ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजप बिनविरोध

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीवर लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे सांगितले जाते. मात्र पहिल्याच पावसात रस्त्याची पुन्हा चाळण होत असेल तर त्या कामांचा दर्जा नेमका कोण तपासतो? निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई का होत नाही? अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासन अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी तत्पर असते. परंतु अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात मात्र उदासीनता दिसून येते. लोकांच्या जीवापेक्षा कागदोपत्री कामांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. भाल, द्वारली, नांदीवली परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता खड्डे बुजविण्याच्या तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी होत आहे.

सण उत्सवांचा कालखंड आता सुरू होत असल्याने त्याआधी कल्याण श्रीमलंगड रस्ता खड्डे मुक्त करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आता रस्ते सुसज्ज करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांना कधी मुहूर्त मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news