Kalyan Crime : कल्याण पूर्वेत सेना-भाजपत रक्तरंजित राडा

नगरसेवक म्हात्रेंवर हल्ला; भावावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
Kalyan Crime  News
कल्याण पूर्वेत सेना-भाजपत रक्तरंजित राडाpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या श्रीराम टॉकीज परिसरात गुरुवारी सायंकाळी सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा समर्थकांमध्ये झालेल्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेवक मधुर म्हात्रे यांना मारहाण करून त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

या हल्ल्यात मधुर म्हात्रे किरकोळ जखमी झाले असून त्यांचा भाऊ निलेश म्हात्रे गंभीर जखमी झाला आहे. एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये जखमी निलेश मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी परस्पर विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.

Kalyan Crime  News
Nagpur Murder | अंगावर ‘तर्री’ उडाल्याच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या!

हा हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी आणि न्यायालयाने कल्याण शहरात प्रवेश करण्यास बंदी घातलेल्या आकाश जयस्वाल याने केल्याचा आरोप नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर आकाशने धारदार शस्त्राने हल्ला केला.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. अर्थात क्रॉस एफआयआर नोंदविण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत आहेत. भर चौकात नगरसेवकावर हल्ला झाल्याने महायुतीत बिघाडी होऊ नये यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी दोन तास कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. दोन्ही गटातील वाद मिटविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, निवडणुकीत आमने-सामने असलेले विक्रम तरे आणि मधुर म्हात्रे या दोघांनीही माघार घेतली नाही. या प्रकरणावर दोन्ही नेत्यांना विचारले असता दोघांनीही बोलणे टाळले.

Kalyan Crime  News
Pimpri RPI Leader: मोशी टोलनाका परिसरात आरपीआय पदाधिकाऱ्याची हॉटेलमध्ये चाकूने हत्या

भर चौकात हल्ला झाल्याने कल्याण पूर्वेत तणावाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आकाश जयस्वाल हा विक्रम तरेंचा माणूस आहे. निवडणुकीतील पराभव पचवता न आल्याने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हल्ला करविला आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

विक्रम तरेंवर गंभीर आरोप

नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी हल्लेखोर आकाश जयस्वाल हा भाजपाचे माजी नगरसेवक तथा उपमहापौर विक्रम तरे यांचा समर्थक असल्याचा दावा केला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर तरे हे अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना जवळ करून असे हल्ले घडवत असल्याचा गंभीर आरोपही मधुर म्हात्रे यांनी केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news