Thane illegal buildings: दागिने विकून घर घेतलं, आता रस्त्यावर संसार; विकासक मालामाल, अनधिकृत घरात राहणारे कंगाल
Thane illegal buildings
ठाणे : प्रवीण सोनावणे
माझे पती मोहम्मद शाह 60 वर्षांचे आहेत आणि त्यांना अर्धांगवायू झाला आहे. ते बर्याच काळापासून अंथरुणाला खिळलेले आहेत. आम्ही पैशांची काटकसर करून 16 लाख रुपयांना हा फ्लॅट विकत घेतला आणि महापालिकेने अनधिकृत म्हणून ही इमारत पाडली. आता आमच्याकडे राहण्यासाठी पर्याय राहिला नाही. त्यामुळे वीज आणि पाणी नसले तरी महापालिकेने अर्धवट स्वरूपात तोडलेल्या या इमारतीमध्ये राहण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, अशी शोकांतिका शीळ परिसरातील अनधिकृत इमारतीमध्ये सदनिका घेतलेल्या जमीला शेख यांनी मांडली.
अनधिकृत बांधकामांमध्ये फसवणूक झालेल्या जमील शाह या एकमेव रहिवासी नसून आतापर्यंत हजारो कुटुंब अनधिकृत इमारती बांधणार्या विकासकांनी उद्ध्वस्त केली आहेत. घराचे स्वप्न दाखवत सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून विकासकांनी कोट्यवधी रुपये कमावले तर इमारत जोपर्यंत पूर्ण उभी राहत नाही तोपर्यंत सोयीस्करपणे दुर्लक्ष करणार्या महापालिकेच्या अधिकार्यांमुळे गेले कित्येक वर्ष सुरु असलेले अनधिकृत बांधकामांचे दृष्टचक्र संपणार कधी? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे.
न्यायालयाचा दणका बसल्यानंतर शीळ भागातील 17 अनधिकृत इमारतींवर महापालिकेने कारवाई केली आहे. यामधील 10 इमारतींमध्ये रहिवासी राहायला आले नव्हते मात्र उर्वरित इमारतीमध्ये रहिवासी राहायला आले होते. त्यामुळे हे सर्व रहिवासी आता बेघर झाले आहेत. प्रत्येकाने आपली जमापुंजी खर्च करून या अनधिकृत इमारतीमध्ये सदनिका घेतली आहे. या इमारतीमध्ये राहणार्या प्रत्येकाची काही तरी शोकांतिका आहे.
इम्रान बारगीर जे लहान हॉटेल व्यावसायिक आहेत. असे काही होईल याचा त्यांनी विचार सुद्धा केला नव्हता. मी नेहमीच मतदानावर विश्वास ठेवला आहे आणि व्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्व बचत करून एक मोठा फ्लॅट खरेदी करण्यासाठी लावली. जेणेकरून माझे संपूर्ण कुटुंब आरामात राहू शकेल. बिल्डरने आम्हाला मोठी आश्वासने दिली. मला एका जवळच्या मित्राकडून या प्रकल्पाबद्दल कळले आणि मी त्या जागेला भेट दिली. मात्र पालिका अधिकार्यांनी वेळेवर डोळे का उघडले असते तर आमच्यावर अशी वेळ आली नसती. व्यवस्थेवर विश्वास ठेवल्यानंतर आम्हाला त्रास का सहन करावा लागतो? आम्ही सहा महिन्यांपूर्वी राहायला सुरुवात केली आणि सर्व काही सुरळीत झाले. टीएमसीकडून एकही सूचना आली नाही. मात्र आता न्यायालयाचा निर्णय आला आणि सर्व उद्ध्वस्त झाले.
हमलिमा मर्चंट या खासगी कंपनीत काम करतात. फ्लॅट खरेदी करण्यासाठी यांनी आपले दागिने विकून हा फ्लॅट घेतला. आता आम्हाला रस्त्यावर ढकलले जात आहे. मी माझ्या मुलांचा, विशेषतः माझ्या आजारी बाळाचा कसा सांभाळ करू? आमच्याकडे त्यांना खायला अन्नही नाही. मुंब्रामध्ये अशा हजारो इमारती फक्त नोटरी कागदपत्रांवर विकल्या जात आहेत.
हे कोणी का थांबवत नाही? आणि आमची चूक काय? सर्व राजकारणी आणि अधिकारी आम्हाला टाळत आहेत. आम्ही गरीब आहोत आणि आमच्याकडे निवारा नाही. अशी शोकांतिका त्यांनी व्यक्त केली आहे.
80 टक्के ठाणे अनधिकृत इमारतींनी व्यापले
ठाण्यातील अनधिकृत इमारतींचे हे केवळ एकमेव उदाहरण नसून पूर्वी झालेल्या आणि आता होत असलेल्या अनधिकृत इमारतींमुळे 80 टक्के ठाणे आणि अनधिकृत आणि जीर्ण इमारतींनी व्यापले आहे. विकासक इमारत बांधून कोट्यवधी रुपये पैसे कमावतात. पालिकेचे अधिकारी या बांधकामांकडे जोपर्यंत न्यायालयाचा दणका बसत नाही तोपर्यंत दुर्लक्ष करतात आणि या चक्रात अडकतो तो सर्वसामान्य घर घेणारा सर्वसामान्य ठाणेकर.
2023 मध्ये तक्रारी करूनही केले दुर्लक्ष...
तक्रारदारांनी 2023 च्या सुरुवातीला ठाणे महापालिका आणि ठाणे पोलिसांकडे यासंदर्भात अनेक तक्रारी सादर केल्या होत्या, ज्यात बेकायदेशीर कारवाया अधोरेखित झाल्या होत्या. मात्र याकडे महापालिका आणि पोलिसांनीही लक्ष दिले नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींना पालिका अधिकारीच पूर्णपणे जबाबदार आहेत.

