

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील शहाड स्टेशन जवळच्या कोळीवाड्यात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून जोरदार राडा झाला. सख्ख्या काका-पुतण्याच्या कुटुंबांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत दगड आणि हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. या हाणामारीत तिघांनी एकमेकांची डोकी फुटली असून हा सारा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात शनिवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून राडा झाला. या हाणामारीत पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने हल्ला चढविण्यात आल्याचेही दिसून येते. या राड्यात एकमेकांच्या जीवावर उठलेले तीन जण जखमी झाले आहेत. यातील विनोद कोट हा गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे. विनोद हा आई-वडिलांसोबत शहाड परिसरात राहत आहे. वडिलोपार्जित जमिनीवरून काकांच्या सोबत त्याचे गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. शनिवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. विनोदचे वडील दत्तात्रय कोट हे घराच्या टेरेसवर साफसफाई करत असताना, त्याचाच गैरसमज काकांना झाला. काकांनी टेरेसवर पाण्याची टाकी बसवली जात असल्याचा आरोप करत वाद सुरू केला. वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झाले. काका विष्णू कोट, काकू लिलाबाई कोट आणि त्यांचा मुलगा कुणाल कोट यांनी विनोद आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली सुरू केली.
यावेळी मध्यस्थी करणाऱ्या विनोदवर लोखंडी टोकदार हत्याराने सपासप वार केले. डोक्यास डोळ्याजवळ वार झाल्याने विनोद जबर जखमी झाला. तरीही दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. यात तीन जण किरकोळ जखमी, तर एक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन्ही कुटुंबांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
जखमींवर उपचार सुरू
दरम्यान जमिनीच्या वादातून सख्ख्या नात्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे कोट कुटुंबीय राहत असलेल्या परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यातली जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वडिलोपार्जित जमिनीच्या वादाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.