Shahapur Water Crisis: पाऊस लांबल्याने शहापूरमध्ये अतितीव्र पाणीटंचाई;अल निनोचे सावट

धरणांचा तालुका असलेल्या शहापूरमध्ये पाण्यासाठी रणकंदण
Shahapur Water Crisis
Shahapur Water CrisisPudhari
Published on
Updated on

शाम धुमाळ

कसारा: मुंबई, ठाणे आणि कल्याणची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस लांबल्याने पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. भातसा, तानसा, वैतरणा आणि मध्य वैतरणा या महाकाय धरणांच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींना मात्र घोटभर पाण्यासाठी डोंगर-दऱ्या तुडवत मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे.

एकीकडे प्रकल्पांसाठी लाखो लिटर पाणी सहज उपलब्ध होत असताना दुसरीकडे तहानेने व्याकूळ झालेल्या आदिवासींच्या वाट्याला कोरडी घागर आणि प्रशासनाची उदासीनता आली आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनांमुळे आणि पाऊस उशिरा पडल्याने शहापूरमधील पाणीटंचाई आता मानवी संकटात रूपांतरित होत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.

Shahapur Water Crisis
ZP Schools admission: राज्‍याच्‍या सात जिल्‍ह्यांमध्‍ये मराठी शाळांना पालकांचा अग्रक्रम

धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरमध्ये शेकडो गावे आणि पाड्यांतील नागरिकांना उन्हाळा सुरू होताच पाण्यासाठी डोंगर-दऱ्या पालथ्या घालाव्या लागतात. विहिरी, कुपनलिका, ओढे आणि नदीपात्रे कोरडी पडल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुले मैलोनमैल चालत पाण्याचा शोध घेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, टंचाई निवारणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. २००८ पासून मंजूर असलेल्या अनेक नळपाणी पुरवठा योजना आजही भ्रष्टाचार, दिरंगाई आणि निष्क्रियतेच्या गर्तेत अडकलेल्या आहेत.

परिणामी, धरणांच्या उंबरठ्यावर राहणाऱ्या आदिवासींच्या नशिबी आजही पाण्यासाठीची वणवण कायम आहे. एका बाजूला नागरिक घोटभर पाण्यासाठी त्रस्त असताना दुसऱ्या बाजूला मोठ्या रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांसाठी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप होत आहे.

स्थानिकांच्या मते, रोज तीन ते चार लाख लिटर पाणी विविध प्रकल्पांकडे वळवले जात असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. गरीब आदिवासींना पाणी मिळत नसताना प्रकल्पांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Shahapur Water Crisis
JNPA Industrial Zone: जेएनपीएच्या भू-वापर बदलास तीव्र विरोध; उरण तालुक्यातील ग्रामस्थ एकवटले

टंचाईग्रस्त भागात बांधण्यात आलेले अनेक बंधारे निकृष्ट कामांमुळे पाणी साठवण्यात अपयशी ठरत आहेत. पाटबंधारे आणि वन विभागाने दुरुस्ती केलेल्या काही बंधाऱ्यांमध्येही पाणी टिकत नसल्याने ते कोरडे पडले आहेत. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर खर्च झालेला निधीही वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. कळभोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच जया सोमनाथ वाख म्हणाल्या, मुंबईकर धरणातील शुद्ध पाण्याचा आनंद घेत आहेत; पण धरणालगत राहणाऱ्या आम्हाला पाणीही मिळत नाही. हा आमच्या नशिबी आलेला अन्याय आहे.

अल निनोच्या सावटाने संकट अधिक गडद

यंदा हवामानातील बदल आणि एल निनोच्या परिणामामुळे पाणीस्रोत झपाट्याने आटत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनांमुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहापूरमधील आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे. धरणांच्या कुशीत राहूनही तहानेने होरपळणाऱ्या या नागरिकांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news