Shahapur power outage : शहापूरच्या ग्रामीण भागात विजेचा सावळा गोंधळ

पाऊस, झाडांच्या फांद्या, तांत्रिक बिघाडांचे कारण; दैनंदिन जनजीवन विस्कळीत
 Power Outage
Power OutagePudhari
Published on
Updated on

शहापूर : शहापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असून काही ठिकाणी तासन्‌तास वीज गुल राहत आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

धसई, किन्हवली, डोळखांब, कसारा परिसरातील दुर्गम गावे, तसेच वाशिंद, आसनगाव, भातसानगर आणि इतर ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या वीजखंडितमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडतात, मोबाईल नेटवर्कवर परिणाम होतो, इंटरनेट सेवा खंडित होते तसेच लघुउद्योग आणि व्यावसायिक व्यवहारही ठप्प होतात.

 Power Outage
Ratnagiri Rain update : दापोलीत अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात

सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. पाणी उपसा करणारे पंप, कृषी पंप आणि अन्य विद्युत उपकरणे बंद पडल्याने शेतीची कामे रखडत आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासावर आणि परीक्षेच्या तयारीवरही परिणाम होत असल्याची पालकांची तक्रार आहे.

महावितरणकडून पावसामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडणे, वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होणे, रोहित्र (डीपी) निकामी होणे तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव काहीवेळा वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याचे सांगितले जाते.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्ती पथके कार्यरत असल्याचेही महावितरणकडून वेळोवेळी सांगितले जाते. दरम्यान ग्रामीण भागातील जीर्ण वीजवाहिन्या, झुकलेले विद्युत खांब, झाडांच्या फांद्यांची नियमित छाटणी, निकामी रोहित्रांची तातडीने बदली आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 Power Outage
Pune Monsoon Rainfall Update: पुणे जिल्ह्यात काही भागांत दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पावसाळ्याच्या संपूर्ण कालावधी मध्‍ये वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह ठेवण्यासाठी महावितरणने विशेष कृती आराखडा राबवावा, अशी अपेक्षा वीज ग्राहक व्यक्त होत आहे.

शहापूर तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात काही तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात, हे मान्य असले तरी वारंवार आणि दीर्घकाळ वीज जाणे हे चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांवर, लघुउद्योगांवर तसेच घरगुती कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. महावितरणने वीजपुरवठा अधिक स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती, देखभाल आणि पर्यायी व्यवस्था तातडीने करावी. तसेच वीज खंडित होण्याचे कारण व वीज कधी सुरू होणार याची माहिती ग्राहकांना वेळेवर देणेही गरजेचे आहे.

नितीन भोईर, वीजग्राहक, धसई फिडर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news