Ratnagiri Rain update : दापोलीत अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात

वादळी पावसाचा फटका; भूमिगत वीजवाहिनी प्रकल्‍पावरच प्रश्‍नचिन्‍ह, नागरिकांतून संताप
Ratnagiri Rain update
दापोलीत अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात
Published on
Updated on

प्रवीण शिंदे

दापोली : दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक गावांचा वीजपुरवठा गेल्या तीन ते चार दिवसांपासून खंडित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे महावितरणकडून भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरू असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे दीर्घकाळ वीज नसल्याने या प्रकल्पाच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कर्दे, लाडघर, मुरूड, बुरोंडी तसेच दाभोळ परिसरात वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित आहे. तहसीलदार अर्चना बोंबे यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्दे येथे पडलेले वीजखांब उभारण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावांचा वीजपुरवठा सुरळीत होईल, तसेच तालुक्यात इतर ठिकाणीही महावितरणची पथके युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगितले.

महावितरण अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार, समुद्रकिनारी भागात तीव्र वादळी वाऱ्यांमुळे झाडे वारंवार वीजवाहिन्यांवर कोसळत असल्याने दुरुस्ती करूनही पुन्हा नुकसान होत आहे आणि त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यास विलंब होत आहे. मात्र, नागरिकांकडून वेगळाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दापोली तालुक्यात गेल्या दोन ते चार वर्षांपासून भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले, मात्र अनेक ठिकाणी ते आजही व्यवस्थित दुरुस्त झालेले नाहीत. भूमिगत केबल टाकलेल्या भागांमध्ये खड्डे पडणे, रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास अशा अनेक तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत भूमिगत केबलसाठी एवढा खर्च करून, नागरिकांनी रस्त्यांच्या गैरसोयी सहन करूनही तीन-तीन दिवस वीजपुरवठा खंडित राहत असेल, तर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ नेमका काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रत्यक्षात भूमिगत केबल केवळ काही मोजक्याच भागात टाकण्यात आली आहे का, उर्वरित वीजजाळे अद्याप ओव्हरहेड वाहिन्यांवरच अवलंबून आहे का, किंवा भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाची कामे अद्याप अपूर्ण आहेत का, याबाबत महावितरणने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी होत आहे. एकीकडे प्रतिकूल हवामानात महावितरण कर्मचारी आणि प्रशासन परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाची सद्यस्थिती, त्याचा नेमका लाभ आणि वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमागील कारणे याबाबत महावितरणने नागरिकांसमोर स्पष्ट माहिती मांडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news