Pratap Sarnaik controversial post : मंत्री सरनाईक यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट
मिरा रोड ः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विषयी समाज माध्यमावर एका समाज कंटकाने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. याप्रकरणी मिरा भाईंदर येथील कार्यकर्ते आक्रमक झाले असून या समाज कंटकावर त्वरीत कारवाई करण्यासाठी काशीमीरा, काशीगाव, मिरा रोड, नवघर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. तसेच पोलीस उपआयुक्त राहुल चव्हाण यांची भेट घेवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
परिवहन मंत्री हे चांगले काम करत असून त्यांची बदनामी करण्यासाठी समाज माध्यमावर पोस्ट केली असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकार्यांनी केला आहे. अशा पोस्ट मुळे समाजात अशांतता पसरत आहे. मंत्री सरनाईक यांच्या विषयी टाकलेल्या पोस्टमध्ये भाईंदरच्या उड्डाणपुलावर झालेल्या एका दुर्दैवी अपघाताचा संदर्भ देण्यात आला आहे . त्या अपघातात डिलिव्हरी करणार्या एका कर्मचार्याचा मृत्यू झाला होता. पोस्टमध्ये या घटनेची जबाबदारी परिवहन मंत्र्यांवर टाकत, त्यांच्याकडे जबाब मागावा, असा उल्लेख करण्यात आला होता.
या पोस्टमुळे आक्रमक पवित्रा घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अनेक कंपन्या ग्राहकांना सेवा देताना कर्मचार्यांच्या जीवाशी खेळत आहेत. कर्मचार्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यास भाग पाडले जात नाही. अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतरही या कंपन्यांची बेपर्वाई सुरूच आहे. यावेळी समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करणार्या अज्ञात व्यक्तीची कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस उपआयुक्त राहुल चव्हाण यांनी शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.

