

दिनेश कांबळे
डोळखांब : शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी अमृतकुंभ धरण तयार करावे, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे यांनी लावुन धरली होती. याबाबत कोकण पाटबंधारे विभागाकडून संबंधित धरण क्षेत्राची स्थळपहाणी देखील केली होती.मात्र मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हा प्रस्ताव धुळखात पडला होता. या धरणाचा आराखडा पुन्हा नव्याने तयार करून सकारात्मक अहवाल मंत्रालय स्तरावर सादर करण्याच्या सुचना आ.कथोरे यांनी पाटबंधारे खात्याला केल्या असुन पुन्हा पाटबंधारे विभागाने सुधारीत आराखडा तयार करून शासनाला पाठवला आहे. त्यामुळे अंदाजे सत्तर टक्के पाणी पिण्यासाठी तर अंदाजे तिस टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाणार असल्याचे सांगितले जाते.
ठाणे-मुंबई शहरांची तहान भागविणारा तालुका म्हणून शहापुर तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा अशी मोठाली जलाशय आहेत. मात्र तालुक्यातील खर्डी,वाशाळा,तलवाडा-डोळखांब, कसारा-मोखावणे, आटगाव, कळमगाव, पेंढरघोळ, अजनुप, शिरोळ, वरस्कोळ, दहिगाव, पळशिण, भोसपाडा, अंबिवली, टेंभा, बेलवड, धामणी, जरंडी, बिरवाडी, चांदे, कानविंदे, कळमगाव, किन्हवली आदीसह तालुक्यातील ग्रामिण भागाला उन्हाळ्यात तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. धरण झाल्यास या गावांना याचा फायदा होवु शकतो. असे असतांना गेल्या अनेक वर्षापासून शहापुर तालुक्यात घाटनदेवी येथील खोर्यामध्ये शहापुर तालुक्यासाठी स्वतंत्र धरण व्हावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र सरकारी यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
परंतु शहापुरात उत्तरेकडील दक्षीण बाजुला कसारा घाट रस्त्याचे डावी कडील खोर्यात पाच ते सात दर्यांमध्ये अमृतकुंभ धरण उभारले जावु शकते. प्रस्तावित धरणाचा परिसर 200 ते 500 मिटर भुभागावर असल्यामुळे गुरुत्वाकर्षण पध्दतीने गाव पाड्यांना सहजपणे पाणीपुरवठा करता येईल. येथील जमिन वन विभागाचे मालकिची असुन,धरण परिसरात एकाही गावाचा समावेश नसल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही. किंवा नोकर्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही.या प्रस्तावाकडे सर्व प्रथम खर्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी त्र्यंबक डोंगरे, प्रकाश सांडे ,भरत पांढरे यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.व लोकप्रतिनिधी पर्यंत हा विषय पेहचविला होता.याकरिता खर्या अर्थाने अमृतकुंभ धरणाची संकल्पना आमलात आली तर बर्यापैकी तालुका टँकरमुक्त होण्यासाठी मदत होईल. यासाठी नव्याने पाठविलेल्या आराखड्यावर विचार विनिमय करण्यासाठी मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक होणार आहे.
चारशे योजना केवळ कागदावरच पूर्ण
सद्यस्थितीत शहापुर तालुक्यातील पुर्वीच्या भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, तसेच जल स्वराज्य मिळुन दोनशे योजना तर आताच्या जल जिवन मिशनच्या अंतर्गत येणार्या दोनशे योजना मिळुन चारशे योजना केवळ कागदावरच पुर्ण झाल्या असुन शहापूरतील पाणी टंचाई कायम तशीच आहे. तर भावली योजनेचे काम सुरू होवुन मुदत संपेपर्यंत योजनेची रक्कम चारशे कोटी रूपयांवर गेली असतांना देखील ही योजना सपशेल फेल ठरली आहे. जागोजागी चर्या खोदुन, पाईप टाकुन ठेवले आहेत. यावर स्वतः भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे लक्ष देवुन अडचणी सोडवित आहेत.
दरवर्षी टंचाईवर कोट्यवधींचा खर्च
दरवर्षी तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यावर करोडो रूपयांचा आराखडा तयार केला जातो. जर चारशे योजना पुर्ण झाल्याचा तसेच भावली योजना यशस्वी झाल्याचा निर्वाळा संबंधित अधिकारी, ठेकेदार देत असतील तर दरवर्षी शहापूरतील पाणी टंचाईवर करोडो रूपये का खर्च करावे लागतात, हा प्रश्न आहे.