semi-English education Kalyan-Dombivli Muncipal School
डोंबिवली शहरः संस्कृती शेलार
आपल्या मुलालाही इंग्रजी शाळेत घालावं, असं अनेक पालकाचं स्वप्न असतं. मात्र, खिशाला परवडणाऱ्या फी नसल्यामुळे हे स्वप्न अनेक गरीब व मध्यमवर्गीय पालकांना गमवावं लागतं. मात्र आता या स्वप्नांना हातपाय फुटणार आहेत, ते ही महानगरपालिकेच्या शाळांमधून! कल्याण -डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ७ सेमी इंग्लिश शाळा सुरू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली, तिसगाव, पाथर्ली, उंबर्डे, बारावे, मांडा आणि मोठागाव या परिसरातील शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण सुरू होऊन, नव्या शैक्षणिक पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे. या शाळांमध्ये माध्यम मराठीच कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र गणित व विज्ञान हे निवडक विषय इंग्रजीतून शिकवले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच पुढील स्पर्धात्मक शिक्षणासाठी बळ मिळणार आहे.
या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अगदी सोपी आणि पारदर्शक ठेवण्यात आली आहे. शिक्षण सुरू होताच, विद्याथ्यर्थ्यांना वह्या, पुस्तकं, दप्तर, मोजे, बूट या सर्व गोष्टी मोफत दिल्या जातील. 'निपुण भारत अभियान' अंतर्गत प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय 'विनोबा भावे अॅप'च्या माध्यमातून शाळेचं डिजिटल मॉनिटरिंग करण्यात येणार आहे.
शालेय वर्ष २०२५-२६ पासून खालील महापालिका शाळांमध्ये सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
१. मनपा शाळा क्र. १९ नेतिवली, कल्याण (पूर्व)
२. मनपा शाळा क्र. १८ तिसगाव, कल्याण (पूर्व)
३. मनपा शाळा क्र. ६२ पाथीं, डोंबिवली (पूर्व)
४. मनपा शाळा क्र. १२ उंबर्डे, कल्याण (पश्चिम)
५. मनपा शाळा क्र. ६८ बारावे, कल्याण (पश्चिम)
६. मनपा शाळा क्र. ६० मांडा, टिटवाळा (पूर्व)
७. मनपा शाळा क्र. २० मोठागाव, ठाकुर्ली, डोंबिवली (पश्चिम)