राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी ठाण्यातून १० प्रकल्पांची निवड
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये ठाण्याचे बाल वैज्ञानिक चमकले आहेत. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या ३० प्रकल्पांपैकी ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक 10 प्रकल्पांची निवड करण्यात आली असून, कनिष्ठ गटात ठाण्याच्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचा हृदयम पाठक आणि विख्यात नवलका या बालवैज्ञानिकांचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
विद्यार्थ्यांच्या बाल वयात विज्ञानाची आवड जोपासली जावी, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा या उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रात ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट ही संस्था या परिषदेचे आयोजन व नियोजन करीत असते. यंदा या परिषदेचे ३१ वे वर्ष असून, यंदाचा मुख्य विषय 'आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे' असा आहे.
यावर्षीची परिषद २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या परिषदेची राज्यस्तरीय फेरी ९ व १० डिसेंबर रोजी नाशिक येथील धनलक्ष्मी हायस्कुल येथे पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्हातून ४ हजार ५०० पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी जिल्हा पातळीवर झाली होती. त्यातील १८८ निवडक प्रकल्प राज्यस्तरावर सादर झाले होते. ३२ तज्ज्ञ व्यक्तीने या प्रकल्पांचे परीक्षण केले. व त्यातून ३० प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर सादर करण्यासाठी निवडले गेले.
निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये सर्वाधिक दहा प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील असून, पुणे ४ , रायगड ४, अकोला, कोल्हापूर, नाशिक प्रत्येकी २, धुळे , जळगाव , नागपूर , रत्नागिरी, सांगली, सातारा प्रत्येकी १, असे ३० प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले आहेत. हे सर्व बालवैज्ञानिक महाराष्ट्रातील अन्य बालवैज्ञानिकांसोबत राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान स्पधेर्त सहभागी होणार आहेत. या बालविज्ञान परिषदेचे कार्य यशस्वी करण्यासाठी ठाण्यातील सुरेंद दिघे यांच्या अध्यक्षतेखालील जिज्ञासा ट्रस्ट गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे.
हेही वाचा

