मिरा रोड : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत एका इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्या 32 वर्षीय नराधमाने त्याच इमारती मध्ये राहणार्या एका 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात विनयभंग सह पोक्सोचा गुन्हा दाखल करत सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. (Latest Thane News)
भाईंदर पूर्वेच्या एका इमारती मध्ये 12 सप्टेंबर रोजी दुपारच्या 2 ते 3 च्या सुमारास 9 व्या मजल्याच्या पायर्याजवळ 32 वर्षीय सुरक्षा रक्षक याने त्या पीडित चिमुरडीच्या अज्ञानाचा फायदा घेत अत्याचार करून विनयभंग केला. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी, महिला पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांनी भेट दिली. त्यानंतर तात्काळ नराधम आरोपीचा शोध घेऊन अटक करून मिरा भाईंदर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोशन देवरे हे करत आहेत.