Bike Accident Compensation: दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबाला; 1 कोटी 5 लाखांची भरपाई
ठाणे : शनिवारी ठाण्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत मोटार अपघात प्राधिकरणा समोर आलेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वराच्या कुटुंबीयांना प्राधिकरणाने एक कोटी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला. (Latest Thane News)
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात संतोष उत्तम तायगडे हे राहत होते. ते मुळचे सांगली जिल्ह्याचे रहिवाशी होते. ते बी. फार्म. पदवीधर होते. ते व्ही-एन्शुअर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 11 लाख 94 हजार 978 रुपये होते. 21 जून 2024 रोजी संतोष तायगडे हे गावी गेले होते. गावी दुचाकीवरून प्रवास करीत असताना त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव कारने सांगली जिल्ह्यातील मांगळे फाटा चौकाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली.
त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण हे मोटार अपघात प्राधिकरणाकडे मृतकाचे वारस पत्नी प्रियांका तायगडे, अल्पवयीन मुलगी तसेच वयोवृद्ध आई-वडील यांनी ठाणे मोटार अपघात न्यायालयात दावा दाखल केला होता. ठाणे येथे शनिवार, 13 सप्टेंबर रोजी रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीतील हा दावा निकाली काढण्यात आला. न्यायधीश अद्वैत सेठना, मंजुषा देशपांडे, ठाणे प्रमुख जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. बी. अग्रवाल आणि ठाणे न्यायालयातील इतर न्यायाधीशांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. या प्रकरणी दावेदारांचे प्रतिनिधित्व अॅड. समीर देशपांडे यांनी केले, तर टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीतर्फे अॅड. अरविंद तिवारी यांनी काम पाहिले.

