

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025
ठाणे : शंभराव्या संमेलनाच्या उंबरठ्यावर असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला तोलामोलाचा अध्यक्ष लाभावा, यासाठी महामंडळासह घटक संस्था प्रयत्नशील आहेत. साहित्य संमेलनाच्या मांडवापासून आजतायगायत दूर राहिलेले आणि संमेलनाध्यक्षपदाला नकार देणारे ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे, आ. ह. साळुंखे आणि मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी अहवालरूपाने महत्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांची नावे चर्चेत आहेत.
32 वर्षांनी साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असलेल्या सातार्याला साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. साहित्य संमेलनाच्या निवडणूकीत होणारे वादविवाद, एकमेकांवर होणारी चिखलफेक टाळण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने स्वतःच्या घटनेत बदल केला. महामंडळाच्या घटक संस्थांशी चर्चा करून एकमताने संमेलनाध्यक्ष निश्चित केला जातो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ संमेलनाध्यक्षाची निवड करत असले तरी त्यावर कुठला ना राजकीय वरदहस्त किंवा त्या-त्या प्रांतातील साहित्यिकाची वर्णी लावण्याची प्रथा रूढ होत चालली आहे.
महामंडळाचे दप्तर मुंबईकडे असतांना वर्धा, अमळनेर आणि दिल्लीच्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षांची निवड करतांना आणि एकूणच आयोजनात महामंडळाने सत्ताधार्यांपुढे मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा होती. यंदा पश्चिम महाराष्ट्रात संमेलन होत असल्याने संमेलनाध्यक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिक असेल, अशा चर्चा सुरू आहेत.
१. यात मराठीला अभिजात दर्जा नुकताच मिळाला असल्याने यासाठी अभ्यासपूर्ण अहवाल तयार करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे तसेच ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांचे नाव आघाडीवर आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही इच्छुक आहे. गेल्या वर्षी आधी त्यांनी संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला नंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली, तोपर्यंत लोककलांच्या अभ्यासिका ज्येष्ठ साहित्यिक ताराबाई भवाळकर यांचे नाव निश्चित झाले होते.
२. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या साहित्यिकांनी भूषवावे, अशी महामंडळाची इच्छा आहे. त्यामुळे महामंडळ या तीन मान्यवरांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करू शकते. महामंडळाचे दप्तर सध्या पुण्यात आहे. येत्या 14 सप्टेंबर रोजी महांडळाची बैठक आहे. त्यात संमेलनाध्यक्षाच्या नावाची चर्चा होणार असून ऑक्टोबर मध्ये गुलबर्ग्यात होणार्या महामंडळाच्या वर्धापनदिनापर्यंत संमेलनाध्यक्षांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.