

Sankalppurti pujan... BJP state president Ravindra Chavan's family visits Pimpaleshwar Mahadev
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा डोंबिवलीतील श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जागेचा १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला. राज्य सरकारने मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर केला. या निर्णयाचा एकीकडे आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास सहकुटुंब मंदिरात संकल्पपूर्ती पूजन केले. यावेळी शिवभक्त भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जागेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी पहाटे सहकुटुंब श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरात जाऊन शिवशंकराचे दर्शन घेतले व संकल्पपूर्ती पूजन केले.
यावेळी उपस्थित प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डोंबिवलीतील श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी सुरू असलेली १४ वर्षांची लढाई अखेर यशस्वी ठरल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण शेवटी बोलताना म्हणाले.
पुढच्या सोमवारी मंत्र्यांचा जथ्था डोंबिवलीत उतरणार
विशेष म्हणजे येत्या सोमवारी ८ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री श्रीक्षेत्र पिंपळेश्वर मंदिरात उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी मंदिरात कीर्तन व महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपळेश्वर मंदिर हा डोंबिवलीकर ग्रामस्थांच्या वैयक्तिक आस्थेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा विषय आहे. मंदिराच्या जागेसाठी गेली १४ वर्षे सातत्याने संघर्ष सुरू होता. शासनाच्या या निर्णयामुळे डोंबिवलीकरांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले.