श्रीकृष्ण द बाळ
महाड : सुमारे 99 वर्षांपूर्वी सर्वसामान्य जनतेला सामाजिक समतेचा समान न्याय मिळावा म्हणून चवदार तळे येथे पाणी प्राशन करणाऱ्या सत्याग्रहणे संपूर्ण जगाला नव्हे तर जगाला समतेचा संदेश दिला असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना काढले.
चालू वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानले त्या महात्मा फुले यांच्या दोनशे व्या वर्षानिमित्त तसेच गाडगेबाबा यांच्या 150 व्या व चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 100व्या वर्षानिमित्त शासनाने पुढील वर्ष हे समता व समरसतेचे वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतल्याची त्यांनी घोषणा केली.
महाड ही ऐतिहासिक भूमी असून या परिसरात स्वराज्याची स्थापना केली गेली तेच स्वराज्य समते सोबत असावे लागते असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले समाजात समता व अधिकार असला पाहिजे हे संविधानाने सांगितल्याचे स्पष्ट करून समतेकडे जाणारा रस्ता हा समरसतेच्या मार्गाने जातो असे निदर्शनास आणले या सत्याग्रहाणे देशाच्या इतिहासामध्ये निर्णायक भूमिका बजावण्याचे नमूद करून फ्रेंच राज्यक्रांतीने जर जगाचा इतिहास बदलला असेल तर भारतासाठी चवदार तळे सत्याग्रह तेवढाच महत्त्वाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
समाजामध्ये असलेली गुलामगिरीची भावना अनिष्ट प्रथा मुळे निर्माण झाल्याचे सांगून असा असंघटित समाज नेहमीच पराजित होत राहिला याकडे त्यांनी लक्ष वेधले या प्रथा नसत्या तर देश कधीच गुलाम झाला नसता असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधान परिषदेमध्ये चार ऑगस्ट 2023 रोजी सीके खोले यांनी आणलेल्या राज्यातील सर्व पाणवठे सर्व समाज बांधवांना खुले करावीत या निर्णयाची अंमलबजावणी महाड नगरपालिकेने केल्याचा त्यांनी निदर्शनास आणले. समतेच्या संघर्षाचा इतिहास जोपर्यंत जनमानासापर्यंत पोहोचला जात नाही तोपर्यंत त्या संघर्षाचे मोल कळणार नाही, आगामी काळात चवदार तळ्याचे पाणी स्वच्छ व निर्मळ असेल यासाठी जाहीर योजनेद्वारे विहित मुदतीत कामे होतील असा विश्वास व्यक्त केला.
तत्पूर्वी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी चवदार तळे सत्याग्रहाचा दिवस आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहिल्याचे नमूद केले आम्हाला सामाजिक न्याय हवा होता तो न्याय आता मिळाला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रहा बरोबरच नाशिकच्या काळाराम मंदिरातही सर्वांना मंदिर खुले व्हावे म्हणून सत्याग्रह केला होता याकडे लक्ष वेधले 1956 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आता या समाजाला कोणीही अडवत नसून खोट्या तक्रारी आता होत नसल्याचे सांगून डॉक्टर आंबेडकर यांचे विचार माणसे जोडण्याचा आहे असे सांगितले देशात संविधान बदलण्याच्या केल्या जाणाऱ्या गप्पांविषयी तीव्र प्रतिक्रिया देताना संविधान बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही असा प्रयत्न जो करेल त्याच्या हाताला आग लागेल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्थानिक आमदार व मंत्री भरत शेठ गोगावले यांनी स्थानिक जनतेने आपल्याला चार वेळेला येथून निवडून देताना चवदार तळ्या संदर्भात राहिलेल्या अनेक गोष्टी पूर्ण करण्याची संधी मंत्रिमंडळात आपला सहभाग झाल्यामुळे प्राप्त झाल्याचे नमूद करून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होणाऱ्या छत्रपतींच्या शिवसृष्टी प्रमाणेच महाड परिसरात भीमसृष्टी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत करावी असे आवाहन केले महाड पोलादपूर परिसरामध्ये अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या गावांचा आवर्जून उल्लेख करून आजच्या 99 व्या वर्षी सुमारे 56 कोटी रुपये खर्चून चवदार तळे सुशोभीकरण कामाकरिता मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आल्याबद्दल त्यांनी तमाम जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली महाड पासूनची ही चळवळ पुढे देश व जगापर्यंत गेली असे सांगतानाच त्या मूळ महाडमध्ये मात्र ही जागा दुर्लक्षित का राहिली असा प्रश्न आपल्याला पडल्याचे सांगून मागील वर्षी आलो असतानाच आपण येथील विकास कामांविषयी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या सह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विशेष निधी देण्याची मागणी केल्याचे सांगितले गुलामाला माणूस बनविण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्या बाबासाहेबांच्या क्रांती भूमी दीक्षाभूमी व चैत्यभूमी येथील कार्यक्रमासाठी जेवढा निधी लागेल तेवढा सर्व निधी शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली महाडच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये शहरातील या विकासात्मक कामाकरता आपला खारीचा वाटा राहिल्याबद्दल आपल्यालाही विनम्र संधी प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले दलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हेच माध्यम असून मुख्यमंत्री महोदयांनी आजपर्यंत आपल्या विभागाला बाराशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
आगामी काळात 60 वस्तीगृहांची उभारणी करावयाची असून यामध्ये सत्तावीस हजार विद्यार्थी राहतील अशी व्यवस्था होईल अशी माहिती दिली डॉक्टर आंबेडकर यांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विविध ठिकाणच्या इमारतींची नव्याने बांधणी व दुरुस्तीसाठी शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामधून विविध ठिकाणची कामे केली जातील असे जाहीर केले याप्रसंगी अनुसूचित जाती जमाती मधील 189 लोकांना समाज कल्याण खात्यात नोकरी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली चवदार तळे कामासंदर्भात येत्या पंधरा दिवसात कामाला सुरुवात होऊन पुढील फेब्रुवारी पूर्वी ही सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला ऐतिहासिक महाडला आगामी काळात देशाच्या नकाशावर उंचावर नेण्याचे काम करणार असून महाड प्रमाणेच बिहारमधील बौद्धगया येथे जाणाऱ्या भीमभक्त अनुयायांसाठी स्थानिक शासनाकडून दहा एकर जागा प्राप्त झाल्यास त्या ठिकाणी भीम अनुयायांसाठी होस्टेल बांधण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या घोषित केलेल्या नोकरी संदर्भातील काही लाभार्थींना त्यांच्या नियुक्ती पत्रांचे वाटप मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रमुख भाषणापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी पावणे दहाच्या सुमारास महाडमध्ये हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना चौकामध्ये अभिवादन करून त्या पश्चात चवदार तळे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सामाजिक न्याय विभागामार्फत चवदार तळे सुशोभीकरण वाणिज्य विकासात्मक कामांच्या 55 कोटी 80 लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. मागील दोन दिवसापासूनच या 99 व्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनासाठी संपूर्ण देशभरातून लाखो भीम अनुयायी महाडमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. चवदार तळे सत्याग्रह निमित्ताने डॉक्टर आंबेडकर प्रेमी विविध संघटनांच्या वतीने या ठिकाणी जाहीर सभांचे तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.