

भाईंदर: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील शिकारकांडातील आरोपी डॉ. राजेश पालांडे यांनी गोळी लागून मृत झालेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांचे वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
डॉ. पालांडे यांच्या नावे नोंदणीकृत असलेल्या दवाखाना व रुग्णालयाच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या वैधतेची तसेच संबंधित वैद्यकीय व्यावसायिक आचरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील जैन यांनी केली आहे.
मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील सर्वे क्रमांक १०१ येथे वन्यप्राण्याची शिकार करताना गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये विजय सुकुर सापटे यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्याच्या तपासाच्या अनुषंगाने डॉ. राजेश पालांडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन होण्यापूर्वीच मृत्यू प्रमाणपत्र दिले. त्यात त्यांनी मृत्यूचे कारण आजार किंवा हृदयविकार असल्याचे नमूद करून गोळी लागल्यामुळे झालेल्या मृत्यूची बाब लपविली. याचप्रमाणे घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही. याची गंभीर दखल घेत काशिगाव पोलिसांनी डॉ. राजेश पालांडे यांना अटक केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. पालांडे यांनी सापटे यांचे मृत्यू प्रमाणपत्र कोणत्या वैद्यकीय तपासणीच्या व कागदपत्रांच्या आधारे दिले, त्यामध्ये मृत्यूचे कारण काय नमूद करण्यात आले, तसेच संबंधित प्रमाणपत्र देताना लागू असलेल्या वैद्यकीय नियमांचे व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले होते किंवा नाही, याची सक्षम प्राधिकरणामार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच डॉ. राजेश पालांडे यांच्या नावे नोंदणीकृत असलेल्या दवाखाना व रुग्णालयाच्या नोंदणी प्रमाणपत्राची, नोंदणीच्या अटींची व संबंधित परवान्यांची तपासणी करण्यात यावी.
विजय सापटे यांच्या मृत्यू संबंधित प्रकरणात
डॉ. राजेश पालांडे यांनी दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्राची सत्यता, त्यातील मृत्यूच्या कारणाची नोंद व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया यांची संबंधित पोलीस यंत्रणा व सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाकडून पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे दिलेल्या पत्रामध्ये काशिगाव पोलीस ठाण्याकडून या प्रकरणासंदर्भात अधिकृत माहिती व आवश्यक कागदपत्रे मागवून संबंधित डॉक्टरांच्या व्यावसायिक आचरणाची चौकशी करण्यात यावी. या चौकशी दरम्यान मृत्यू प्रमाणपत्र देताना गंभीर अनियमितता, चुकीची माहिती नोंदविणे, तथ्ये लपविणे किंवा वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित कायदे व नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
लागू कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तसेच संबंधितांना कायदेशीर संधी देऊन, उल्लंघन सिद्ध झाल्यास डॉ. राजेश पालांडे यांच्या नावे असलेल्या दवाखाना व रुग्णालयाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित अथवा रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
संबंधित चौकशीचा अहवालाची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, हे प्रकरण सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता व मृत्यूच्या कारणासंबंधी अधिकृत नोंदींच्या विश्वासार्हतेशी संबंधित असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी.
कोणत्याही व्यक्ती विरुद्ध केवळ आरोपांच्या आधारे अंतिम निष्कर्ष न काढता, उपलब्ध पुरावे व अधिकृत नोंदींच्या आधारे निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.