Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्ग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 20 ठार

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्ग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 20 ठार
Published on
Updated on

डोळखांब/ कसारा; पुढारी वृत्तसेवा :  समृद्धी महामार्गावरील विघ्ने संपायला तयार नाहीत, असे चित्र सोमवारच्या मध्यरात्री पुन्हा पुढे आले. शहापूरजवळील सरलांबे या गावाजवळ गर्डर बसविण्याचे काम मध्यरात्री सुरू असताना गर्डर कोसळून 20 कामगारांचा चिरडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच इंजिनिअर्सचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह सापडले आहेत; तर चार गंभीर कामगारांवर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गर्डरवर 24 कामगार काम करत होते. यातील चार कामगार सुखरूप बचावले. समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून एका बाजूला अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. काम करताना एवढ्या प्रमाणात कामगार मृत्युमुखी पडण्याची दुर्घटनेची ही पहिलीच वेळ आहे. (Samruddhi Mahamarg Accident)

शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गापासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या सरलांबे गावच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सोमवारी मध्यरात्री 12.38 च्या सुमारास 15 कामगार आणि पाच इंजिनिअर्सच्या उपस्थितीत काम सुरू होते. त्यावेळी अचानक लाँचरसह गर्डर काम करणार्‍या कामगारांवर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच सर्वांत आधी स्थानिक गावकरी मदतीसाठी धावले. त्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि समृद्धीच्या कामगारांनी मिळून क्रेनच्या सहाय्याने गर्डरखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले. सर्व मृतदेह शहापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. रात्री उशिरा सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) दादा भुसे, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तहसीलदार कोमल ठाकूर, जीवरक्षक टीम शहापूर व इतर यंत्रणा घटनास्थळी उपस्थित होत्या. मंगळवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. (Samruddhi Mahamarg Accident)

कंपनी मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील या दुर्घटनेत मृत पावलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना तत्काळ आर्थिक मदत व्हावी, दुर्घटनेस जबाबदार असणार्‍या संबंधित ठेकेदार कंपनी मालक तसेच प्रशासकीय यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपाइं आठवले गटाने केली आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष विनोद थोरात यांनी दिला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाख; तर केंद्राची दोन लाखांची मदत

दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची तातडीची मदत तसेच केंद्र शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवर शासकीय खर्चातून उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. (Samruddhi Mahamarg Accident)

येथील दुर्घटनेतील मजुरांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवले जात आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटना आणि मजुरांचा मृत्यू अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारा आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

  हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news