

कसारा (ठाणे) : एकीकडे देशभर राजकीय नेते व भारतीय जनता स्वतंत्रता अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसरीकडे याच भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जनता रस्ता, विज, पाणी, आरोग्य सारख्या सुविधांपासून वंचित असल्याने गरोदर माता असो वा अन्य गंभीर आजारी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डोली करून 10 किलोमीटर पायी प्रवास करण्याची वेळ आदिवासी बांधवांवर येत आहे.
शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत क्षेत्रातील दापूरमाळ हा पाडा सुमारे 100 वर्षापासून वसलेला आहे. शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या सावरकूट पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांवर दवाखाना, बाजारहाटसाठी 10 किलोमीटर पायी चालून डोंगर चढ उतार करीत कसारा गाठण्याची वेळ येत आहे. मूलभूत
सुविधांपासून वंचित असलेले दापूरमाळ गावाचा आजपर्यंत विकास झालेला नाही. रस्ता नाही, वीज नाही, त्यामुळे अचानक झालेली आपत्ती, घटना असेल तर मोठा प्रश्न उपस्थित होतो. दवाखाण्यात पोचवायचं कसे, हा प्रश्न आजही तसाच आहे. आज दापूरमाळ येथे राहणारे चिमा पारधी ह्या वृद्ध ग्रामस्थांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी गावापासून मुख्य रहदारीच्या रस्त्यापर्यंत यायला 10 किलोमीटरचा पायी पल्ला गाठायचा होता. अशा वेळी गावातील तरुण व नातेवाईकांनी डोली तयार करून आजारी वृद्ध चिमा पारधी यांना डोलीत टाकून त्यांना डोंगर दरींतून पायी घेऊन हे नातेवाईक पावसाचा सामना करीत माळ गावठा या मुख्य रहदारीच्या गावाकडे निघाले मात्र दहा किलोमीटरचा टप्पा गाठण्यासाठी या ग्रामस्थ व वृद्धाच्या नातेवाईकांनी अनेक अडचणीचा सामना करत माळ गावठा गाठला. त्यानंतर माळ गावातून चिमा पारधी यांना खासगी वाहनाने इगतपुरी येथे रुग्णालयात दाखल केले.
आपल्या देशाचा स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा झाला. परंतु आमच्या गावाचा विकास काही होईना. आपल्या घरातील गर्भवती, वयोवृद्ध, आजारी असलेल्या माणसांना नातेवाईकांकडे नेवून ठेवावे लागते ही अत्यंत खेदाची बाब आहे. परंतु रस्ता नसल्याने दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आम्ही अजुनही वंचितच आहोत.
अनंता वारे, अजनूप, ग्रामपंचायत सदस्य
चिमा पारधी या रुग्ण वृद्धाला दहा किलोमीटर डोलीत पायी घेऊन रुग्णालयात निघालेल्या ग्रामस्थांनी दापूरपासून 5 किमी अंतर कापल्यावर अचानक रस्त्यावर मोठे झाड आडवी पडले व पायवाट देखील बंद झाली. अशा वेळी डोली घेऊन निघालेल्या लोकांनी वृद्ध चिमा पारधी यांना डोली सह उचलून घेत पडलेल्या झाडावरवर चढून खाली उतरून पुढील प्रवास सुरु केला. त्यानंतर वृद्धाला इच्छित रुग्णालयात दखल केले.