

डोंबिवली : डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात चार वर्षाच्या मुलीसह २३ वर्षीय तरूणीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर केडीएमसीचा वैद्यकिय आरोग्य विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यातच कोट्यवधी रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयातील अतिदक्षता विभाग वर्षभरापासून टाळेबंद अवस्थेत आहे. गोरगरीब रूग्णांसाठी तयार करण्यात आलेला हा विभाग बंद असल्याने या विभागाशी संबंधित रूग्णांची परवड होत आहे.
डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात रविवारी २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेतून अधोरेखित झाले आहे. ठाकूर कुटुंबीयांकडे पाहणी म्हणून मुक्कामी गेलेल्या ४ वर्षीय प्राणवी आणि तिची २३ वर्षीय मावशी बबली उर्फ श्रुती या दोघा निष्पापांचे बळी सरपटणाऱ्या प्राण्याने जरी घेतले असले तरीही या दोन्ही निष्पापांच्या मृत्यूस जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा वैद्यकिय आरोग्य विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केडीएमसीच्या कल्याणातील रूक्मिणीबाई आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. वेळीच उपचार न मिळाल्याने, तसेच आयसीयूच्या अभावीच्या प्राणवी आणि बबली उर्फ श्रुती या दोघींचा मृत्यू झाल्याचा देखिल आरोप करण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात वर्षभरापूर्वी आयसीयू युनिट उघडण्यात आले होते. या विभागाची जबाबदारी ज्याच्यावर होती त्या संबंधित ठेकेदाराने अवघ्या दहा दिवसांत पळ काढला. त्यानंतर केडीएमसीने पुन्हा एकदा निविदा काढली. मात्र या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जवळपास वर्षभर महापालिका प्रशासनासह आरोग्य विभागाला आयसीयू युनिट बाबत विसर पडल्याचे दिसून येते. लाखो रूपये खर्च करून उभारण्यात आलेले आयसीयू युनिट टाळेबंद आहे.
आरोग्य सुविधा अद्ययावत करावी
कल्याण-डोंबिवलीतील करदाते हजारो रूपयांचा कर महापालिकेला अदा करतात. मात्र सर्दी, खोकला आणि तापाच्या पलीकडे जर रूग्णांना त्यांना हव्या असलेल्या आरोग्य सुविधा मिळू शकत नसतील तर हा कर का म्हणून भरायचा? असा सवाल कल्याण-डोंबिवलीकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे. एकीकडे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेबाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी देखील ठाम भूमिका घ्यावी. महापालिकेची व्हेंटिलेटरवर असलेली आरोग्य सुविधा अद्ययावत करावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीकरांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या गंभीर समस्ये संदर्भात माहिती देण्यासाठी संबंधित कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्चुन बांधलेल्या कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयातील अतिदक्षता विभाग केव्हा कार्यान्वित होणार ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.