

डोंबिवली : सर्पदंश झालेल्या दोन्ही मुलींना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. या मृत्युकांडाची आठवडाभर तांत्रिक चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अखेर त्या दोघींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली डॉ. जाधव यांना निलंबित करण्यात आल्याचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी जाहीर करून उफाळलेल्या वादावर पडदा पाडला आहे.
रविवारी २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यातील ठाकूर कुटुंबीयांकडे पाहुणी म्हणून मुक्कामी राहिलेल्या ४ वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची २३ वर्षीय मावशी बबली उर्फ श्रुती ठाकूर या दोघींना गाढ झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. या दोघींना उपचाराकरिता शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राणवी भोईर हिचा येथेच, श्रुती ठाकूर हिचा मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी ठाण्यातील सिव्हील
हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. दोघींच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला. रूग्णांच्या नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्यामुळे दोन्ही रूग्णांचा मृत्यु झाल्याबाबत तक्रार केली. या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, इतर कर्मचारी आणि शास्त्रीनगर रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. त्याअनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल यांनी ३ ऑक्टोबर रोजी अहवाल सादर केला आहे.
प्राणवी आणि बबली उर्फ श्रुतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघींनाही मण्यार सापाने दंश केला होता. अपघात विभागात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघींनाही तपासले आणि ताबडतोब उपचार सुरू केले. दोन्ही रूग्णांना तात्काळ सर्पदंश विरोधी लस देण्यात आली. प्राणवी भोईर हिच्याबाबत मधील बालरोग तज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता. प्रयोगशाळेत आदी तपासण्या त्वरीत करण्यात आल्या. तर प्राणवी भोईर हिची प्रकृती चिंताजनक वाटल्याने तिला तात्काळ ठाण्यातील सिव्हील हॉस्पीटलमध्ये संदर्भित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्सीजन सपोर्टसह महापालिकेच्या रूग्णवाहिकेतून संदर्भित करण्यात आले. तसेच श्रुती ठाकूर हिला अतिदक्षता विभागात निरीक्षणासाठी ठेवण्याची आवश्यकता वाटल्याने सिव्हील हॉस्पीटलला संदर्भिय करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही रूग्णांना शास्त्रीनगर सामान्य रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेमधून एकत्रीत संदर्भित करण्यात आले. तसेच सदर दोन्ही रूग्णांना वेळेवर व मार्गदर्शक सुचनांप्रमाणे उपचार करण्यात आले.
रात्रपाळी असूनही डॉक्टर पहाटे गैरहजर
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव यांची आदल्या दिवशी शनिवारी २७ सप्टेंबर रोजी रात्रपाळी होती. तथापी रात्रपाळी असूनही डॉ. संजय जाधव हे रूग्णालयात पहाटे उपस्थित नव्हते. वरील घटनाक्रम पाहता वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दिलेल्या अहवालाप्रमाणे डॉ. संजय जाधव यांनी आपल्या कर्तव्यात हजर न झाल्यामुळे कर्तव्यात कसूरी केली आहे. त्यामुळे ते निलंबनाची कारवाईस पात्र आहेत. डॉ. संजय जाधव यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) (फ) नुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सेवेतून या आदेशान्वये निलंबित करण्यात येत आहे. त्यांच्या निलंबन काळात आरोग्य मुख्यालय हे मुख्यालय राहील. डॉ. संजय जाधव यांना वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबित असताना खासगी नोकरी किंवा धंदा अनुज्ञेय असणार नाही, असे निलंबन आदेशात आयुक्त अभिनव गोयल यांनी म्हटले आहे.