

खांब : श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील वाळंजवाडी पहूर येथील पूर्वीच्या काळातील ओळखला जाणारा तसेच केदार जननी मातेच्या पहाडी कड्यालागत असलेल्या गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेतून गड संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमीना शिवकालीन ऐतिहासिक अवशेष सापडले. त्यामुळे येथे पूर्वीचा ऐतिहासिक गड किल्लाच असल्याचे म्हटले जात आहे. तर येथे हे शिवप्रेमी मागील दोन वर्ष या डोंगर परीसरात भटकंती आणि संवर्धन मोहिमेतून काम करतात. या माध्यमातून या ठिकाणी त्यांना वरती काही ठिकाणी पाण्याचे टाकं तसेच गडाला असल्यासारखी तटबंदी, जोते, ऐतिहासिक चिरे, कौलांचे आणि मातीच्या मडक्यांचे तसेच माती विटांचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक डोंगराला ऐतिहासिक गडाचा दर्जा मिळावा अशी मागणी शिव प्रेमींच्या माध्यमातून पुरातत्व खाते आणि रायगड प्राधिकरण विभाकडे केली जात आहे.
रोहा तालुक्यामध्ये अवचितगड, घोसाळेगड, सुरगड आणि बिरवाडी गड (भवानी गड) असे चार किल्ल्यांची नोंद आहे, पण सह्याद्री मधले भटके आणि रायगड टूर गाईडचे सदस्य आनंद सोनाराम सानप, किशोर सावरकर, कृष्णाराम जाधव, केतन फुलपगारे, सौरभ घरट, दत्तात्रेय सावंत काका यांनी रोहा तालुक्यात इतिहासाच्या आणि काळाच्या ओघात लुप्त झालेले गडकोट किल्ले संवर्धन आणि त्याच्या संरक्षण मोहिमेच्या भटकंतीतून डोगर कड्यातून ऐतिहासिक ठेवेचा शोध घेत गेली अनेक वर्ष रायगड आणि दुर्ग, गड संस्था यांच्या माध्यमातून तसेच शिवप्रेमी म्हणून हे ऐतिहासिक कार्य करत आहेत. याच अनुषंगाने तालुक्यातील पहूर वाळंजवाडी आणि सभोवतालचा प्रदेश हा ऐतिहासिक शिल्प वीरगळ सतिशीला यांनी समृद्ध आहे आणि त्याचेच संदर्भ घेऊन रायगड टूर गाईड सर्विसचे आनंद सानप यांनी भोवतालच्या परिसरात शोध मोहिमा आणि अभ्यास मोहिमांना सुरुवात केली. शोध मोहीम दरम्यान वाळंजवाडी हद्दीत असणाऱ्या आणि पहूर कडील बाजूला असणाऱ्या एका डोंगरावर त्यांना किल्ल्याचे असणारे काही अवशेष आढळून आले. डोंगरावर आठ पाण्याचे टाक, कौलांची खापरे मटक्याची खापरे, तटबंदी दगडाचे चीरे, विटांचे अवशेष असे काही भरपूर सारे काही ऐतिहासिक काळातील अवशेष मिळाले आहेत.
वर डोंगर माथ्यावरून नजरेतून समोर सुरगड, घनगड, तैलबैला, सुधागड, कुर्डू, कोकण दिवा, अवचित गड, केदार जननी डोंगर, कुंडलिकेचा खोरे, सह्याद्री पर्वयाची भली मोठी रांग, भिरा टाटा पॉवर जणींचा डोंगर आणि त्याचा भुयार तसेच पाण्याचं टाक असे इतिहासाचे साक्ष देऊन जात आहे. वेगवेगळे चिरे आणि काही तटबंदी चिरे पाण्याचे टाकं आणि त्याला कडेला त्याकालीन पोळ होल अच्छादन म्हणजे पाण्याच्या टाकीवरती सावली क्षेत्र असे काही ठिकाणी साक्ष देत आहेत. तसेच पायथ्याशी देखील काही शिवकालीन कडे हे साक्ष देत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहेत.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ल्यांचे जतन संवर्धन करणाऱ्या गडप्रेमी शिवप्रेमी व संस्था यांना शासकीय निधीची तरतूद करावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा तसेच इतिहासाची ओळख पुढच्या पिढीला निर्माण व्हावी तसेच पडक्या वस्तू दुरुस्त करणे, किल्ल्यांचे पावित्र्य राखणे यासारखे उपक्रम काही सामाजिक संस्था उपक्रम राबवत असतात. गड किल्ल्यांचे संवर्धन जतन या गोष्टींना शासकीय निधी देण्याची शासनाने तरतूद करावी.
भिवा पवार, जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना
अनेक वर्षे गड संवर्धनाचे कार्य करत असताना या परिसरात सत्यशील विरगळ आढळून येत असल्याने गेली दोन वर्षे सातत्याने या डोंगरावर एक ऐतिहासिक शिवकालीन दुर्ग गड असावे ही भावना मनात ठेवून आम्ही वर चढून या ठिकाणी शोध मोहीम आणि काम करत आहोत. अनेकदा वेळेअभावी माघारी गेलो मात्र एकच ध्यास घेऊन पुन्हा प्रयत्न मी आणि माझे सवंगडी रस्ता करून ही मोहीम आजतागायत राबवत असताना या ठिकाणी संवर्धन करत असतांना ऐतिहासिक शिवकालीन अवशेष त्यामध्ये पाण्याचे टाकं, तटबंदी असलेले कठडे, शिवकालीन चिरे, कौलांचे, मडक्यांची खापर, विटांचे अवशेष असे सापडत आहेत. त्यामुळे याला तालुक्यातील चार गडकिल्यांप्रमाणे गडकिल्ल्याचा दर्जा मिळावा तसेच त्याची नोंद व्हावी या उद्देशाने इतिहास अभ्यासक यशवंत पुत्र मोहन फराटे हे पाहणी करणार असून तद्नंतर ऐतिहासिक किल्ला म्हणून याची पुरातत्व खात्याने आणि रायगड प्राधिकरण विभाकडे याला गड किल्ला म्हणून ओळखला जावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
आनंद सोनाराम सानप, रायगड टूर गाईड सर्विस