

भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामे फोफावत असतानाच या अनधिकृत बांधकामांमधील चाळी व झोपड्या शहरासाठी दिवसेंदिवस घातक ठरू लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशी अनधिकृत बांधकामे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विकली जात असल्याने त्याच्या विळख्यात शहरामध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे अलिकडेच काशिमीरा येथील घडलेल्या हाणामारीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
यापूर्वी देखील मीरारोड येथील नशेबाज तरुणांच्या टोळक्याने अग्निशमन केंद्राबाहेर धुडगूस घातला होता. तर मीरारोडमधीलच एका बारच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवाशांवर हल्ला करण्यात आला होता. या सर्व प्रकरणांमध्ये परप्रांतीय, बांगलादेशी तसेच रोहिंग्ये असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. यातील बहुतांशी रोहिंग्ये, बांगलादेशी व परप्रांतीय लोकं अनधिकृत चाळी, झोपड्यांमध्ये आश्रय घेताना दिसून येतात. अशा अनधिकृत बांधकामातूनच शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीचा आलेख गेल्या काही दिवसांत वाढल्याचे दिसून आले आहे.
अलिकडेच काशिमीरा येथील दाचकूल पाड्यात रोहिंग्यांसह काही बांग्लादेशींनी स्थानिकांवर धारदार शास्त्रांनी हल्ला चढवून काही तरुणांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद मंत्रालयापर्यंत पोहोचले असून त्यावर उत्तर देणाऱ्या पोलिसांना तूर्तास घाम फुटला आहे.
अशातच या ठिकाणी विजेसह पाण्याची समस्या गंभीर असली तरी येथील बेकायदेशीर वास्तव्य करणारी लोकं बेकायदेशीर बोअरवेल मारून पाण्याचा अनधिकृत व्यवसायदेखील करताना दिसून येतात. तर दलालांचा सुळसुळाटही येथे झालेला आहे. याविरोधात जाणाऱ्यांची वीज जोडणी खंडित करणे तसेच त्यांचा पाणीपुरवठा रोखणे, असे प्रकार याठिकाणी सर्रास सुरू आहेत.
कोणत्याही बांधकामाला वीज जोडणी देण्यासाठी रितसर कागदपत्रे तर बहुतांशी ना हरकत दाखला अनिवार्य ठरतो. मात्र येथील अनधिकृत झोपड्यांसाठी कोणतीही रितसर कागदपत्रे नसताना तसेच ना हरकत दाखला नसताना वीज जोडणी कशी काय दिली जाते, असा सवाल उपस्थित होत आहे. असाच प्रकार उत्तनमधील डोंगरी येथे प्रस्तावित असलेल्या मेट्रो कारशेडच्या जागेत उभारण्यात आलेल्या झोपड्यांच्या बाबतीत झाल्याचे दैनिक पुढारीनेच चव्हाट्यावर आणले होते.
ही जागा शासनाची असतानाही त्यावर बेकायदेशीर झोपड्या बांधून त्यांना ना हरकत दाखला न मिळविताच वीज जोडणी देण्यात आली. दैनिक पुढारीच्या वृत्तानंतर कारवाई करण्यात आली. काही शाबूत अनधिकृत झोपड्या रोहिंग्ये, बांगलादेशी व परप्रांतीयांना अल्प दरात विकल्या जातात. दरम्यान अशा बेकायदेशीर बांधकामातील बेकायदेशीर व्यक्तींना वीज व पाण्याचा पुरवठा देखील बेकायदेशीरपणेच केला जात असल्याचे निदर्शनास येते. पुढे गुन्हेगारीचा आलेख इतका वाढतो की ते अवैध धंदे वाढीस लागत असल्याचे समोर येते आहे.
ठोस कारवाईची मागणी...
राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, मादक द्रव्ये काशिमीराच्या एका पाड्यातून हस्तगत झाल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अशी गुन्हेगारी प्रवृत्ती बंद करण्यासाठी पालिकेने येथील अनधिकृत झोपड्या, चाळी जमीनदोस्त करून शहरात प्रामुख्याने देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी, अशा अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत.