

मुंब्रा : कोकणात लवकरच विमानसेवा सुरू होणार असून रत्नागिरीची विमानतळ सेवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याची मोठी घोषणा उदय सामंत यांनी केली. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन फाइव स्टार हॉटेल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ७०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
कोकणात सद्यस्थितीत दुष्काळाची परिस्थिती आहे. यासाठी नुकसान भरपाई पंचनामे करण्यात आले आहेत. शासनाकडून मदत देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशातच आता रत्नागिरीवासीयांसाठी पालकमंत्री तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पर्यटन उद्योग व नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, रत्नागिरी येथे दोन फाईव्ह स्टार हॉटेल उभी राहत आहेत. एक एक्स्प्रेस इन व दुसरे महिंद्रा क्लब ही दोन्ही हॉटेल मिळून मोठ्या प्रमाणात जवळपास ७०० जणांना रोजगाराच्या संधी रत्नागिरी येथे उपलब्ध होणार आहेत.
या दोन्ही फाइव्ह स्टार हॉटेलना टाटाच्या स्किल सेंटरशी टायअप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या स्किल सेंटरमधून विविध कोर्स करून बाहेर पडलेल्या मुलांना या हॉटेलमध्ये रोजगाराच्या संधी देण्याचा निर्णय या दोन्ही हॉटेल व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रत्नसिंधू योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू, जिल्हाधिकारी मनुज जिंदाल उपस्थित होते.
सिंधुदुर्गची चिपी विमानतळ टर्मिनल बिल्डिंग आठ वर्षापूर्वी पूर्ण झाली होती. आपण रत्नागिरी विमानतळ टर्मिनल बिल्डिंग दोन वर्षात पूर्ण केली. या दोन्ही विमानतळांमधला फरक सामंत यांनी स्पष्ट करत रत्नागिरी विमानतळ किती सुसज्ज आहे हे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान चिपी विमानतळाच्या तुलनेत रत्नागिरीचे एअरपोर्ट हे कलेक्टर ऑफिसपासून केवळ दोन किलो मीटरवर आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. फक्त घनकचरा प्रकल्पासाठी आपण एकाच गोष्टीसाठी मागे राहिलो, अशी ही खंत सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रकल्पासाठीचे टेंडर निघाले आहे, मात्र विमानतळाचे काम सुरू असते तर आपल्याला दोन नंबर मिळाला असता. ठाण्यात शिंदे साहेबांनी केली त्याप्रमाणे रत्नागिरीत १५ जणांची आरडीआरएफ आपत्कालीन टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्याला मिळणार सुविधा
महिंद्रा क्लब या फाईव्ह स्टार हॉटेलचे काम ९०% पूर्ण झाले आहे. दुसरे चंपक मैदानावर एक्स्प्रेस इन हॉटेल उभे राहत आहे. जिल्ह्यातील डायलिसिस सेंटर बंद होऊ देणार नाही. पाचही डायलिसिस सेंटरना स्थानिक तांत्रिक कर्मचारी आहेत. जर का संबंधित एजन्सीला ते झेपले नाही तर जिल्हा प्रशासनाकडून ही डायलिसिस सेंटर चालवली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढील महिन्यात आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा आहे त्या दौऱ्यातून आणखी काही सुविधा जिल्ह्याला मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली.
मदत करणारा जिल्हा...
रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रामध्ये मदत करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गुरांसाठी लावणारा चारा हा आपण आपल्या जिल्ह्यासाठी करतोच आहोत. मात्र, अन्य जिल्ह्यासाठी लागणारा चाराही आपण तयार करत आहोत, अशी माहितीही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, मायक्रो फायनान्स हा जवळपास सावकारीसारखा प्रकार आहे. यासाठी जिल्हाधिकारी सोमवारी बैठक घेणार आहेत. महिला बचतगटांना या मायक्रो फायनान्समुळे नॅशनलाईज बँक कर्ज देत नाहीत, या संदर्भात सूचना दिल्या आहेत.