Birsa Munda : आदिवासींचे जननायक भगवान बिरसा मुंडा

Birsa Munda Birth Anniversary
Birsa Mundapudhari photo
Published on: 
Updated on: 

प्रा. डॉ. समीर बुटाला - भूगोल व पर्यावरण विभाग प्रमुख

जंगलांवरील पारंपरिक हक्क कमी होत होते. त्यामुळे जंगलांचे संरक्षण आणि त्यावरील स्थानिक समाजाचा हक्क यांचा संबंध त्यांनी आपल्या संघर्षातून अधोरेखित केला. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास, त्यांचा लढा हा पर्यावरणीय न्यायाचा आणि स्थानिक समुदायांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवरील हक्कांचा लढा होता.

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी छोटानागपूर प्रदेशातील उलिहातू या गावात झाला. हा प्रदेश आजच्या झारखंड राज्यात आहे. त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई करमी हातू होते. ते मुंडा आदिवासी जमातीतील होते. या समाजाची जीवनशैली निसर्गाशी घट्ट जोडलेली होती. शेती, जंगलातील फळे-फुले, वनौषधी, पशुपालन आणि सामुदायिक श्रम यांवर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. जमिनीची मालकी ही केवळ व्यक्तीची नसून समाजाची सामूहिक संपत्ती आहे, अशी त्यांची धारणा होती.

Birsa Munda Birth Anniversary
Marathi Diwali Ank History : मराठी दिवाळी अंक संस्कृती

ब्रिटिश राजवटीत छोटा नागपूरमधील आदिवासींचे जीवन बदलू लागले. इंग्रजांनी - महसूल व जमीनविषयक कायदे लागू केले. बाहेरून आलेले जमीनदार, सावकार, व्यापारी, दलालांनी आदिवासींच्या जमिनी बळकावण्यास सुरुवात केली. कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जाऊ लागल्या. अनेक आदिवासी आपल्या पिढीजात भूमीतच मजूर बनले. बालपणापासूनच बिरसा यांनी आपल्या समाजाची ही व्यथा अनुभवली. शिक्षणातून त्यांना बाहेरील जगाची ओळख झाली; पण त्यावेळी ब्रिटिश राजवट, जमीनदार शाही व सावकारी पद्धतीमुळे आदिवासी समाजाचे होणारे शोषणही त्यांच्या लक्षात आले.

आपल्या लोकांच्या दुःखाकडे पाहून त्यांच्यात परिवर्तनाची तीव्र प्रेरणा निर्माण झाली. बिरसा मुंडा यांनी समाजाला केवळ बंडाचे आवाहन केले नाही, तर स्वच्छता, शिस्त, नैतिकता आणि एकजूट यांचा संदेश दिला. मद्यपान, अंधश्रद्धा, अस्वच्छता, समाजातील अपप्रथांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. परस्परांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्यास त्यांनी लोकांना प्रेरित केले. "आपल्या हक्कांसाठी उभे राहा; पण स्वतःचे जीवनही सुधारा," हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. त्यामुळे त्यांची चळवळ राजकीय संघर्षाइतकीच सामाजिक सुधारणेची चळवळही होती. त्यांच्या कार्याने प्रभावित आदिवासी समाज त्यांना "धरती आबा" म्हणजेच "धरतीचे पिता" म्हणून संबोधू लागला.

Birsa Munda Birth Anniversary
Raigad Tree Cutting : अफाट छत्रविस्ताराच्या महाकाय 'रेन ट्री'ची कत्तल चिंताजनक

हा सन्मान त्यांच्या भूमिप्रेमाचा आणि लोकहितवादी नेतृत्वाचा पुरावा आहे. बिरसा यांनी निसर्गाशी सुसंवादी जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांत "जल, जंगल, जमीन" ही संकल्पना आदिवासी जीवनाच्या मूलभूत अधिकारांशी जोडलेली दिसते. बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या व्यापक उठावाला "उलगुलान" असे म्हटले जाते. उलगुलान म्हणजे मोठी उलथापालथ किंवा अन्यायाविरुद्धचा प्रचंड जनविद्रोह. १८९९ ते १९०० या काळात छोटा नागपूर प्रदेशात या आंदोलनाने तीव्र रूप धारण केले. बिरसा यांनी आदिवासी शेतकरी, युवक आणि सामान्य जनतेला एकत्र आणले.

ब्रिटिश सरकार, जमीनदार, सावकार आणि शोषणकारी प्रशासन यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला. त्यांनी अन्यायकारकांना विरोध केला, शोषणाविरुद्ध संघटित प्रतिकाराची ताकद दाखवून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी ब्रिटिश व्यवस्थेला थेट आव्हान दिले.

ब्रिटिश सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली. बिरसा मुंडा यांना अखेर ३ फेब्रुवारी १९०० रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना रांची कारागृहात ठेवण्यात आले. ९ जून १९०० रोजी कारागृहात त्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे २५ वर्षे होते. इतक्या अल्प आयुष्यात त्यांनी भारतीय इतिहासात अमिट ठसा उमटविला.

१५ नोव्हेंबरनिमित्त धरती आबा बिरसा मुंडा यांचे स्मरण करताना आदिवासी समाजाच्या हक्कांचा आदर करण्याचा, जंगल-जमीन-पाणी या नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याचा आणि समानतेवर आधारित भारत घडविण्याचा संकल्प करूया. बिरसा मुंडा यांचे विचार आणि बलिदान भारताला सदैव मार्गदर्शन करत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.