

डोंबिवली : तिबोटी खंड्या हा पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळणारा पक्षी आहे. भूतान, श्रीलंका, आदी देशांतून दोन-तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होऊन ठाणे जिल्ह्यात आला आहे. थव्यांतून भरकटलेला खंड्या डोंबिवलीत आला आणि कावळ्यांच्या तडाख्यात सापडला. अतिशय सुंदर आणि अत्यंत मनमोहक दिसणार्या खंड्याला वाचविण्यात पॉजला यश आले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील केडीएमसीच्या विभागीय कार्यालयासमोर असलेल्या पी. पी. चेंबर्सच्या गच्चीवर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रंगीबेरंगी खंड्या बसला होता. आपल्या हद्दीत प्रवेश केलेल्या या पक्षाला पाहून कावळ्यांच्या थव्याने त्याला घाबरवून सोडले होते.
एकाच वेळी असंख्य कावळे ओरडत असल्याचे लक्षात येताच चेंबर्समधील काही पक्षीप्रेमींनी पॉज संस्थाचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तोपर्यंत थरथरत्या खंड्याला अलगद उचलून त्याच इमारतीतील पॉजच्या कार्यालयात आणले. पॉजचे स्वयंसेवक ऋषिकेश सुरसे आणि ओंकार साळुंखे यांनी त्याला ताब्यात घेतले.
या स्वयंसेवकांनी खंड्यावर आवश्यक उपचार केले. त्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास शिळफाट्यावरील महापेकडे जाणार्या गणेश खिंडीत असलेल्या जंगल पट्ट्यात निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. परतीच्या प्रवासाला निघालेला तिबोटी खंड्या शहरातील कावळ्यांच्या नजरेत पडला असावा. कावळ्यांनी त्याच्यावर हल्ला केला असावा, असे पक्षी मित्र तथा पॉज संस्थाचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले. संस्थेचे ऋषिकेश सुरसे आणि ओंकार साळुंखे यांनी प्रथमोपचार करून खंड्याला पुन्हा निसर्गात मुक्त केल्याचे डॉ. भणगे यांनी सांगितले.
ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवास
डॉ. निलेश भणगे यांनी दैनिक पुढारीच्या वाचकांसाठी खंड्याच्या संदर्भात माहिती दिली. पावसाच्या सुरुवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात. सगळेच किंगफिशर हे जमिनीमध्ये खोदून त्यात घरटे करणारे असतात. ओढ्यावरती वाकलेल्या फांदीवरून झेप घेऊन वेगाने चोचीच्या साह्याने माती खोदून पुन्हा त्याच वेगाने आपल्या जागी येऊन बसताना यांना खोदताना पाहणे एक पर्वणीच असते असेही डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले. पाल, सापसुरळी, छोटे खेकडे, कोळी, बेडूक, आदी छोटे प्राणी त्याचे आवडते खाद्य असते.
खंड्या रायगड जिल्ह्याचा राजा
2020 मध्ये तिबोटी खंड्याला रायगडचा जिल्हापक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. खंड्या पक्षीप्रेमींचे आकर्षण असते. पक्षीप्रेमींसाठी हा पक्षी खूप खास आहे. त्याचे फोटो टिपण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. खंड्याचा पर्यावरणाशी संबंध असतो. चक्रीवादळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, अशीही भीती डॉ. निलेश भणगे यांनी व्यक्त केली.