

डोंबिवली : परिवहन विभागाचा आवश्यक पक्का परवाना न घेता कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग हद्दीत प्रवाशांना नियमबाह्य पध्दतीने रॅपिडो बाईक टॅक्सीच्या सेवा देणाऱ्या 47 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची ऑनलाईन ॲपद्वारे सेवा देणाऱ्या द रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या विरोधात बेकायदा प्रवासी वाहतूक करून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 93 प्रमाणे रॅपिडो दुचाकी सेवा देणाऱ्या चालक/मालकांनी परिवहन विभागाकडून आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. परिवहन विभागाच्या आवश्यक बाबींची पूर्तता केल्यावर रॅपिडो सेवा देणाऱ्या मालक/चालकांना पक्का परवाना देण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणाचे पालन न करता सेवा देणाऱ्या खासगी कंपन्या ओला, उबेर, रॅपिडोद्वारे पेट्रोल/इंधनावरील दुचाकी बेकायदा चालवून बेकायदा प्रवासी वाहतूक करत आहेत. अशा प्रकारची नियमबाह्य सेवा दिली म्हणून कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात एकूण 47 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाखाहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले.
धोकादायक प्रवास करण्यास मज्जाव
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात अशा दुचाक्यांची संख्या मोठी आहे. या दुचाक्या बेकायदाशीररित्या प्रवासी वाहतूक करत आहेत. या दुचाकीस्वारांकडे कोणत्याही प्रकार परवाना नाही. शासनाने त्यांना कोणताही प्रवासी वाहतुकीसाठी परवाना दिलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी अशा सेवा देणाऱ्या ॲपचा वापर करून कोणत्याही प्रकाराचा प्रवास करून स्वतःच्या जीविताला धोका निर्माण करू घेऊ नये, असे आवाहन कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले आहे.
परवानगीविना ॲपचा वापर
या संदर्भात कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सुप्रिया गावडे यांनी सरकारतर्फे महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशांनुसार फिर्याद दाखल केली आहे. जानेवारी 2025 पासून रॅपिडो सेवा देणाऱ्या द रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीसह संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रवासी वाहतुकीची आवश्यक परवानगी न घेता ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून प्रवासी नोंदणी करून प्रवाशांना सेवा देऊन बेकायदा प्रवासी वाहतूक तर केलीच, शिवाय शासनाचा महसूल देखिल बुडविल्याचा आरोप मोटार वाहन निरीक्षक सुप्रिया गावडे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.