

कांदिवली : रेल्वे फलाटांवर विविध संस्थांच्या पुढाकाराने प्रवाशांची तहान भागवण्यासाठी ‘प्याऊ’ उभारण्यात आल्या आहेत. सध्या या प्याऊंकडे संबंधित संस्थांचे तसेच रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. कांदिवली स्टेशन फलाट क्र.2/3 व प्रभादेवी स्टेशन फलाट क्र.1/2 वर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्याऊंच्या नळांना गळती लागली आहे. पाण्याचा निचरा करणाऱ्या पाईपच्या जोडणीमधून पाणीगळती होत असल्याने फलाटावर पाणी पसरत आहे. यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईत रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कमला देवी सराफ ट्रस्ट, लायन्स क्लब, रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने बहुतांश फलाटांवर ‘जल प्याऊ’ उभारण्यात आले आहेत. हजारो प्रवासी प्याऊंमुळे आपली तहान भागवत असतात. सध्या या प्याऊंच्या नळाला गळती लागली आहे. कांदिवली फलाट 2 व 3 वर असलेल्या प्याऊंच्या बाजूलाच असलेली लोखंडी शिडी अडथळा निर्माण करत आहे.
नळाला तसेच पाणी निचरा करणाऱ्या पाईपाच्या जोडणीला गळती लागल्याने पाणी आजूबाजूला पसरत आहे. तसेच प्रभादेवी फलाटावरील प्याऊच्या नळाला गळती लागली आहे. बाजूलाच तुटलेल्या लादीवर सिमेंट ठोकळा ठेवण्यात आला आहे. घाईगडबडीत असणारे प्रवासी या ठोकळ्यामुळे अडखळतात. यावर रेल्वे प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून फलाटावरील प्याऊंची गळती थांबवावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.