

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कल्याण येथे पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून खासदारांची संख्या वाढविण्यामागचा उद्देश काय ? ५४३ खासदारांनी काय दिवे लावले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील सर्व राज्यांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना केंद्राकडून राज्यांना अवलंबून ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्षाची ठिणगी पडू शकते, असेही भाकित त्यांनी वर्तविले.
राज ठाकरे सध्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी कल्याणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील, अविनाश जाधव, अभिजित पानसे, माजी आमदार तथा सरचिटणीस प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशात सध्या जे काही सुरू आहे, त्यामागचा नेमका हेतू समजून घेणे गरजेचे आहे. देशात सध्या ५४३ खासदार असताना ते काय दिवे लावत आहेत ? असा सवाल करत महिला आरक्षणाच्या नावाखाली खासदारांची संख्या वाढवण्याची गरज काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भविष्यात उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असून, महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होऊ शकतो, अशीही भिती त्यांनी व्यक्त केली.
चोऱ्यामाऱ्या करून सत्ता मिळवली
संपूर्ण देशाला केंद्राच्या नियंत्रणाखाली आणण्याचा हा डाव असल्याची टीका त्यांनी केली, देशाला केंद्रशासित करण्याचा डाव सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाण्यात एका ठिकाणी मतदानाच्या शेवटच्या एका तासात तब्बल ८० ते ८५ हजार मतदान झाल्याचा दावा करत, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होणे प्रत्यक्षात शक्य आहे का ? असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरेंना मते मिळत नाहीत, अशी चर्चा केली जाते, मात्र आमची मते अशा प्रकारे जात असतील तर त्यावरही विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. चोऱ्यामाऱ्या करून मिळवलेली ही सत्ता असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशातील सर्व संस्था केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असतील, तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातही विविध प्रकल्प जनतेवर लादले जात असल्याची टीका करत याच पद्धतीने परिस्थिती राहिल्यास भविष्यात मराठवाड्याचे वाळवंट होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शरद पवार धोका यंत्र
शरद पवार यांच्या दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना त्यांनी होका यंत्र दिशा दाखवते. मात्र शरद पवार हे धोका यंत्र आहेत, अशी मिश्किल टिप्पणी केली. राजकारणात बदल व्हायला हवा, मात्र तो कशा पद्धतीने घडवायचा आणि निवडणुका कशा लढवल्या जात आहेत, हे जनतेने ठरवणे महत्त्वाचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हेच समीकरण सध्या सुरू असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली.