

डोंबिवली : एकीकडे खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना दुसरीकडे शहरातील दुचाक्या गायब करण्याचे उपद्व्याप एका बदमाशाकडून सुरू होते. मात्र या बदमाशाच्या उचापत्या जास्त काळ चालल्या नाहीत. दुचाकी चोरताना सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाला असता हा बदमाश पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत दोन दुचाक्या आणि एक रिक्षा हस्तगत केली आहे. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कुणाल साबळे (27) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. कुणाल हा एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करायचा. मात्र त्याचा वाहने चोरण्याचा गोरखधंदा सुरू होता. गणेशोत्सवादरम्यान पोलिस बंदोबस्तात असल्याची संधी साधून कुणाल याने रस्त्यावर, तसेच इमारतींच्या आवारात पार्क केलेल्या दुचाक्या आणि रिक्षा चोरण्याचा सपाटा लावला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून चौकस तपास सुरू केला.तपासादरम्यान कल्याण पश्चिमेतील एका नामांककित हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी चोरतानाचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर कुणाल पोलिसांच्या रडारवर आला.