

ठाणे : मतदारांना त्यांच्याच सोसायटीमध्ये मतदान करता यावे यासाठी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये काही मोठ्या खासगी गृहसंकुलांच्या आवारामध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. मात्र महापालिका निवडणुकीसाठी यावेळी खासगी गृहसंकुलाना वगळण्यात आले आहे. महापालिकेची निवडणूक ही स्थानिक पातळीवरची असल्याने जर एखाद्या खासगी सोसायटीमध्ये मतदान केंद्र असेल तर मतदान प्रक्रियेवर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रभाव टाकला जाऊ शकतो, अशी भीती प्रशासनाला असल्याने प्रशासनाकडून मतदान केंद्रांसाठी खासगी गृहसंकुलाना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असून जागावाटपाच्या जोरबैठका राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. याच दरम्यान लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय लगबगही शिगेला पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र बनवण्यात आले होते. त्यासाठी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. सोसायटीमध्येच मतदानाची सोय उपलब्ध झाल्याने त्याचा तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला होता. पण आता अशाप्रकारच्या रहिवासी सोसायट्याना आणि इमारतींना यावेळी वगळण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
131 नगरसेवक पदांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष अशा उमेदरांची संख्या पाच ते दहा पट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते राहत असलेल्या गृहसंकुले, इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारल्यास त्यांच्या प्रभावाखाली मतदान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अशा इमारती, रहिवासी सोसायट्यांची छाननी करणेही शक्य नाही. त्यामुळे सरसकट सर्वच सोसायट्यांना मतदान केंद्रांच्या यादीतून वगळण्यात आले असून शाळा, महाविद्यालय, शासकीय इमारतींमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदान केंद्रांची संख्या 2100 पर्यंत जाण्याची शक्यता
ठाणे महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्र उभारण्याचे काम सुरू झाले आहे. 33 प्रभागांमध्ये सुमारे 500 ठिकाणे यासाठी निश्चित करण्यात आली असून मतदान केंद्रांची संख्या 2100च्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. मतदार संख्यानिहाय केंद्रांची यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
बाळकूम, मानपाडामध्ये सर्वाधिक केंद्र
मतदान केंद्र निश्चित करताना 33 प्रभागांमध्ये सुमारे 500 ठिकाणांची चाचपणी प्रशासनाने केली आहे. 131 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होणार असल्याने प्रत्येक पॅनलमधील मतदार संख्येचा विचार करण्यात आला आहे. ज्या प्रभागामध्ये मतदार जास्त असतील तेथे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार बाळकुम, मानपाडा येथील प्रभागांमध्ये मतदान केंद्र सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.
800 ते 900 मतदारांसाठी एक केंद्र
हरकती सूचनांनंतर प्रशासनाने मतदारांची अंतीम यादी जाहीर केली असून त्यानुसार सुमारे 16 लाख 49 हजारांच्या पुढे मतदार आहेत. प्रभागनिहाय मतदारांच्या संख्येनुसार मतदार केंद्र निश्चित केले जात आहे. सुमारे 800 ते 900 मतदारांसाठी एक केंद्र असे प्रशासनाचे नियोजन आहे.