

भाईंदर : पुढारी वृत्तसेवा
मिरा-भाईंदर शहराला पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणातून २१८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जाणार असला तरी उर्वरीत पाणी ठाण्याला देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १३ नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीत एमएमआरडीएला दिले. यावर संतप्त भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी शहराच्या हक्काच्या पाण्यातील एक थेंबही ठाण्याला देणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी या योजनेंतर्गत चेना गावातील पाणी साठवणूक टाकीला विरोध करणाऱ्यांनी पाणीप्रश्नावर बोलू नये, अशी टीका मेहता यांच्यावर केली आहे.
सरनाईक यांनी येत्या तीन महिन्यांत मिरा-भाईंदरला हक्काचे २१८ एमएलडी पाणी मिळवून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सूर्या प्रकल्पाच्या कामात जाणीवपूर्वक अडथळे आणून आता आ. मेहता व महापौर डिंपल मेहता श्रेयासाठी केविलवाणी धडपड करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आ. मेहता व महापौरांनी १८ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारे व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असल्याचे त्यांनी म्हटले.
शहराच्या अत्यंत संवेदनशील अशा पाणीप्रश्नावर केवळ राजकीय पोळी भाजण्यापेक्षा आधी सूर्या प्रकल्पाच्या कामात निर्माण केलेले अडथळे बाजूला करावेत व रखडलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे टोला त्यांनी मेहता यांना लागवला. आज जे लोकप्रतिनिधी सूर्या प्रकल्पाच्या पाण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत, त्यांनीच मागील काळात ठेकेदार भेटला नाही, अशी कारणे पुढे करून प्रकल्पाच्या पाईपलाइनचे काम रोखून धरले होते, असा गंभीर आरोप सरनाईक यांनी आ. मेहता यांच्यावर केला.
विशेष म्हणजे मेहता हे आमदार नसतानाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या पाईपलाइनच्या कामासाठी १५० कोटी रुपयांचा अतिरीक्त निधी मंजूर करून आणल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहराला लवकर पाणी मिळावे, यासाठी शासनाकडे नेमके कोण पाठपुरावा करीत होते, कोणाच्या हट्टामुळे या कामात अडथळे निर्माण झाले, हे शहरातील लोकांना चांगले ज्ञात आहे.
सूर्या प्रकल्पाचे पाणी मिरा-भाईंदर शहराला अद्याप पूर्ण क्षमतेने का मिळू शकलेले नाही, याचे खरे कारण म्हणजे चेना गावाजवळील सुमारे ४५ दशलक्ष लीटर साठवणूक टाकीचे रखडलेले काम. या पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ते थांबविण्यात आले. या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पाण्याच्या टाकीचे काम पुन्हा सुरू केले. पाण्याच्या टाकीला विरोध करणाऱ्यांनी पाणीप्रश्नावर बोलू नये तसेच आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी मेहता यांना दिला.
संभ्रम निर्माण करू नये
सूर्या धरणातून एकूण ५०३ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी २१८ दशलक्ष लीटर पाणी मिरा-भाईंदरसाठी, १७५ दशलक्ष लीटर पाणी वसई-विरारसाठी, ३० दशलक्ष लीटर पाणी सूर्या प्रकल्पा जवळील सिडकोस्थित गावांसाठी तर ७० दशलक्ष लीटर पाणी ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर गावासाठी वितरीत केले जाणार आहे. या पाण्याच्या वितरणाचे आरक्षण २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे मिरा-भाईंदर साठी राखीव २१८ एमएलडी पाण्याबाबत मेहता व महापौरांनी संभ्रम निर्माण करू नये.
जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न...
आ. मेहता यांनी आपल्यावर आरोप करताना ज्या बैठकीचा दाखला दिला, त्याच पत्रात मिरा-भाईंदरसाठी राखीव ठेवलेल्या पाण्याव्यतिरिक्त उर्वरित पाणी ठाण्याला देण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यावरून हे पत्र पाण्याच्या आरक्षणाची वस्तुस्थिती स्पष्ट करीत असताना हे पत्र न वाचता किंवा त्यातील संदर्भ समजून न घेता त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सरनाईक यांनी मेहता यांच्यावर केला आहे.