FDA Raid : नवी मुंबई, पालघरमध्ये एफडीएचे छापे

राज्यात ठिकठिकाणी धडक कारवाई; १.९७ कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त
FDA Raid
FDA Raid file photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील अनियमितता, चुकीचे लेबलिंग आणि प्रतिबंधित घटकांच्या वापराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत १.९७ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून चार परवाने निलंबित आणि पाच विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील खजूर-दालचिनीच्या गोदामावर टाकलेल्या छाप्यात १.११ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील श्री साधक स्टॉकेज (फ्रेश मॅक्स) या गोदामात एफडीएने तपासणी केली. यावेळी सहा ब्रँडचे ७१ हजार ७६२ किलो ओले खजूर आणि २५,८१६ किलो कॅसिया-दालचिनी असा एकूण ९७,५७८ किलो साठा आढळला.

FDA Raid
Floating Palace Mumbai : समुद्रात शाही विवाह सोहळ्यासाठी उभारला जातोय जलमहाल

त्याची किंमत १ कोटी ११ लाख ३ हजार ९०४ रुपये आहे. गोदामात ओली, फाटलेली आणि पाक गळणारी पोती जमिनीवर ठेवण्यात आली होती. आयातदाराचा तपशील, उत्पादन व मुदत दिनांक तसेच बॅच क्रमांकाबाबतही त्रुटी आढळल्या.

पालघर येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन ट्रकमधून ५९,४९६ किलो विनालेबल सुपारी जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत ६८ लाख ७१,७८८ रुपये आहे. दोन्ही वाहनांमधील सुपारीच्या गोण्यांवर लेबल व बॅच क्रमांक नसल्याने हा साठा जप्त करून सील करण्यात आला.

FDA Raid
TMC Engineer Promotion : ठाणे महापालिकेतील आठ उपअभियंत्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामी समर्थ मंदिर परिसरातील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मुख्य पुरवठादार रंगोली स्वीट मार्टकडून ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवाअसा एकूण ८२९ किलो साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये आहे. याशिवाय मंदिर परिसरातील दुकानांतून २१ किलो स्वीट हलवा जप्त करून नष्ट करण्यात आला. चार मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील सागर स्वीट अँड बेकरीच्या दोन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. मिठाई, मावा, तूप, वनस्पती, तेल, सूजी, साखर आणि मैदा यांसह ४ लाख ५८ हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. उल्हासनगर येथील वाहेगुरू ट्रेडर्समधूनही १००.८ किलो फ्रूट फ्लेवर्ड कँडी जप्त करण्यात आली.

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या पेढीचा मैसूरपाक नमुना प्रयोगशाळेच्या तपासणीत असुरक्षित घोषित झाल्याने पेढीचा परवाना निलंबित करण्यात आला. पुण्यातील खाऊ गल्लीत पाच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वैध अन्न परवाना नसल्याने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

६ जणांना अटक

याशिवाय अमरावती विभागात दोन वाहनांसह ६.९४ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करून चार जणांना अटक करण्यात आली. नाशिक विभागातही प्रतिबंधित पदार्थांच्या साठ्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.