ठाणे; पुढारी वृत्तसेवा : इंडियाच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. 'वंचित'चा महाविकास आघाडीत समावेश होणार असल्याचे कळते. आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी फॉर्म्युलाही तयार केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट 20, काँग्रेस 16, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस 10, वंचित आघाडी 2 असा हा 48 जागांचा फॉर्म्युला आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. या 48 जागांपैकी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 20 काँग्रेसला 16 जागा दिल्या जाऊ शकतात. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. शिवसेना एकत्र असताना शिवसेनेचे 18 खासदार आले होते. त्यापैकी उद्धव ठाकरेंसोबत आता 5 खासदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा देण्यात येणार आहेत. मागील लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या. राज्यात उद्धव ठाकरेंबाबत निर्माण झालेली सहानुभूतीची लाट याचा फायदा महाविकास आघाडीला व्हावा, म्हणून सर्वाधिक जागा उद्धव ठाकरे यांना मिळणार आहेत. 20 जागांवरील उमेदवारही उद्धव ठाकरे यांनी निश्चित केले आहेत. काँग्रेसकडूनही तरुणांना संधी दिली जाणार आहे.